X

सत्तेत राहून सेनेचा विरोध कायम

सुभाष देसाई यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

सुभाष देसाई यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

देशात सातत्याने महागाई वाढत असून बेरोजगार ही मोठी समस्या आहे. अच्छे दिनाचे स्वप्न हे स्वप्नच ठरले असून सत्तेत असूनही सातत्याने शिवसेना विरोध करत असून जनतेचा आवाज उठवत आहे. देशात एक कराची घोषणा करण्यात आली. परंतु अद्याप ते प्रत्यक्षात आले नसून पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे तेलांवरील कर कमी करून संपूर्ण देशभरात एक देश..एक कर..एक दर करायलाच हवे अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. महाराष्ट्रातील उद्योग हे राज्याबाहेर जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे त्यांनी सांगितले. राज्यभरात एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्क तयार करणार असून त्यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाच्या माध्यमातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून २०० कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून दहा हजार तरुणांनी मुलाखती दिल्या. त्यापकी दोन हजार तरुणांना तात्काळ  नियुक्तीपत्र देण्यात आले.