|| शेखर हंप्रस

२६ रुग्णशय्यांची सुविधा; प्राणवायू, अतिदक्षता विभागासह जीवरक्षक प्रणालीची सोय

नवी मुंबई : गृहसंकुलाच्या आवारात करोना केंद्र निर्माण करण्यासाठी मुंबई आणि ठाणे महापालिका प्रयत्न करत असतानाच नवी मुंबईत याला यश आले आहे. ‘माझी सोसायटी माझी जबाबदारी’अंतर्गत ऐरोलीतील ‘यश पॅराडाइज’ या गृहसंकुलाने एका खाजगी रुग्णालयाच्या सहकार्याने करोना केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात २६ रुग्णशय्या असून प्राणवायू, अतिदक्षता विभाग, जीवरक्षक प्रणाली यांचीही सुविधा देण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली. काही रुग्णांना खाटा, प्राणवायू सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे गृहसंकुलाच्या आवारात करोना केंद्र निर्माण व्हावे यासाठी काही महापालिका प्रयत्नशील आहेत. ऐरोलीतील यश पॅराडाइज गृहनिर्माण संस्थेने स्वत:चे अद्ययावत वातानुकूलित करोना केंद्र उभे केले आहे. गृहसंकुलामधील कम्युनिटी हॉलमध्ये २६ खाटांची सोय करण्यात आली असून त्यात १६ प्राणवायू खाटा आहेत. अतिदक्षता विभागात पाच खाटा, एक व्हेंटिलेटर, चार सेमी व्हेंटिलेटर खाटा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. या करोना केंद्राचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे.

डॉक्टर, परिचारिका कार्यरत

या करोना केंद्रासाठी गृहसंकुलाजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयाची मदत घेण्यात आली. या केंद्रात कायम सहा डॉक्टर, १६ परिचारिका आणि अन्य कर्मचारी असणार आहेत. शिवाय गरज पडल्यास अन्य रुग्णालयातून डॉक्टर येणार आहेत. ही सेवा देताना शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारण्यात येणार असून गरजू लोकांना त्यातूनही सवलत देण्यात येणार आहे.

पाऊल उचलण्याचे कारण

या गृहसंकुलातील काही रहिवाशांचा करोनामुळे मृत्यू झाला. काही रुग्णांना खाटा, प्राणवायू मिळवण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे स्वत:चे करोना केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गृहसंकुलातील ५०० कुटुंबातील दोन हजार जणांना त्याचा फायदा होणार आहे.

गेल्या दीड वर्षात वेळेवर उपचार न मिळाल्यानेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यात रुग्णालय शोधण्यास अधिक क्रयशक्ती गेल्याचे प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलत गृहसंकुलाच्या आवारात रुग्णालय उभे केले आहे. – विजय चौगुले, अध्यक्ष, यश पॅराडाइज सोसायटी