पाऊस त्यात रस्त्यावरचे खड्डे व वाहतूक कोंडी या समस्या असताना नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी नवी मुंबई ते मुलुंड हा २८ किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ २८ मिनिटांत यशस्वी करीत तीन रुग्णांचे जीव वाचविले. मेंदूतील क्रिया बंद पडल्याने ‘त्या’ रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या शरीराचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने या तीन रुग्णांचे जीव वाचले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नवी मुंबईत राहणारे चाळीस वर्षीय व्यक्तीचा छोटा अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी नेरूळ येथील ‘अपोलो’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत रक्तस्राव अति झाल्याने मेंदूने काम करणे बंद केले होते. या बाबत अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने सदर व्यक्तीच्या नातेवाईकांना ही परिस्थिती समजावून सांगितली.

दरम्यान, मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयातील तीन वेगवेगळ्या रुग्णांना किडनी, लिव्हर आणि हृदय या महत्त्वाच्या अवयवांची गरज असल्याचे त्या रुग्णालय प्रशासनाने अपोलो रुग्णालयालाही कळविले होते.

याबाबत येथील प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईकांशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याच्या शरीराचे अवयवदान करण्यास संमती दिली. त्यानंतर तत्काळ हा ग्रीन कॉरिडॉर आखण्यात आला. यात वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मुंबई वाहतूक पोलिसांची मदत घेत नवी मुंबई ते मुलुंड हा मार्ग मोकळा केला. मंगळवारी रात्री ९.४० ते १०.०८ या कालावधीत हे अवयव नवी मुंबईतून मुलुंड येथे पोहोचविण्यात यश आल्याचे ‘अपोलो’ रुग्णालयाच्या वतीने सतीश मंजूनाथ यांनी सांगितले.