25 April 2019

News Flash

पावसापूर्वीच पाणीचिंता दूर

मोरबे धरण भरून वाहण्यासाठी यंदा वर्षभरात २६०० मिमी पावसाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मोरबे धरण

मोरबे धरणात मुबलक जलसाठा; धरण भरण्यासाठी वर्षभरात २६०० मिमी पावसाची गरज

नवी मुंबई : नवी मुंबईला गेल्या २५ वर्षांत पाण्याची कधी ददात नव्हती. मात्र २०१५ मध्ये तुटीचा पाऊस झाला आणि नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचे ढग जमू लागले.  ते पुढे वर्षभर कायम राहिले. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि ही चिंता मिटली. तेव्हापासून मोरबे धरणातील पाणीसाठय़ाचा लेखाजोखा घेतला जाऊ लागला. यंदाही तो घेण्यात आला, पण नवी मुंबईची चिंता पावसापूर्वीच मिटली आहे.

‘मोरबे’त येत्या ऑक्टोबपर्यंत पुरेल इतका जलसाठा असून गेल्या वर्षी सर्वात जास्त पाऊस पडल्याने हा पुरेसा साठा झाला आहे. तरीही मोरबे धरण भरून वाहण्यासाठी यंदा वर्षभरात २६०० मिमी पावसाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोरबे धरणातून शहरातील पाणीपुरवठय़ासाठी ४२० दशलक्ष घनमीटर पाणी घेतले जाते. यात नवी मुंबईसह कामोठे आणि मोरबे परिसरातील ७ गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. २०१७ मध्ये मोरबे धरण परिसरात ८ जूनला पावसाला सुरुवात झाली होती; परंतु गेल्या वर्षी पावसाला सुरुवात झाली तेव्हा या धरणातील जलसाठा अतिशय कमी होता. मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. त्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. परंतु गतवर्षीच्या ८ जूनपर्यंत धरणाची पातळी ७२.७१ मीटरवर खाली आली होती. त्यामुळे धरणात फक्त गतवर्षी ६७.८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. यंदा धरणाची पातळी ७६.२२ मीटर असून धरणात ९१.०७ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. त्यामुळे २२ ऑक्टोबपर्यंत शहराला आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करू शकेल एवढा जलसाठा मोरबे धरणात आहे.मोरबे धरण परिसरात गेल्या वर्षी मागील चार वर्षांपेक्षा अधिक पाऊस झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षी मोरबे धरण पूर्ण भरले होते.

मोरबे धरणात अद्याप ऑक्टोबपर्यंत शहराला सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाही जवळजवळ २६०० मिमी पाऊस पडल्यास मोरबे धरण भरेल. नागरिकांना मात्र कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही याबाबत प्रशासन सतर्क आहे. पाण्याचे पुरेसे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात नवी मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळेल.

  -मोहन डगावकर,

अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

First Published on May 29, 2018 2:22 am

Web Title: sufficient water storage in morbe dam