सहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतून वायू दलात भर्ती झालेले आणि सध्या भूज येथे सूखोई विमानाचे उड्डाण करणारे शशिकांत अंकुश दामगुडे (वय २६) यांचे भूज येथे रस्ता अपघातात निधन झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. ते नवी मुंबई येथील खारघर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि दोन भाऊ असा परिवार असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक पोलीस उपअधीक्षक विठ्ठल दामगुडे यांनी दिली. रविवारी रात्री बारा वाजता खारघर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत दामगुडे यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामामध्येअन्त्यसंस्कार करण्यात आले.
गुजरातमधील भूज येथे इनोव्हा कारने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दामगुडेंच्या गाडीला जोरदार ठोकर दिली. या अपघातामध्ये दामगुडे व त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दामगुडे यांचे पार्थिव पुणे येथील वायू दलाच्या अकादमीत आणण्यात आले, तेथे वायू दलाच्या जवानांनी शासकीय मानवंदना दिल्यानंतर रात्री ते पार्थिव खारघर वसाहतीमधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आणण्यात आले. रविवार आणि गणेशोत्सवाचा काळ असल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका दामगुडे यांचे पार्थिव आणणाऱ्या शववाहिनेला बसला. ही शववाहिनी खारघरला तब्बल तीन तास उशिरा पोहचली. दामगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वायू दलाचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक जमा झाले होते.
शशिकांत यांनी यापूर्वी पुणे येथील वायू दलात काम केले होते. सध्या त्यांच्यावर सूखोईच्या वैमानिकपदाची जबाबदारी होती. शशिकांत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील महुडे-बुद्रुक हे आहे. त्यांचे वडील भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये कार्यरत होते. मागील वर्षी त्यांचे निधन झाले आहे. शशिकांत व त्यांचे दोन्ही भाऊ अभ्यासात अतिशय हुशार होते. हे तिघेही दहावीच्या गुणवत्ता यादीत आले होते. शशिकांत यांचा याच वर्षी ३० मे या दिवशी नवीन पनवेल येथे राहणाऱ्या विनया वासुदेव पाटील यांच्याशी विवाह झाला होता. विनया या प्रसारमाध्यमांमध्ये काम करतात. तरुण वैमानिक शशिकांत यांच्या अपघाती मृत्युमुळे केंद्रीय विहार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.