मूत्रपिंडाचा आजार; खारघरमधील सावकारी साम्राज्याला हादरा

राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सुरज बात्रा याचा गुरुवारी दुपारी तळोजा कारागृहात मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. न्यायाधीश संतोष जयस्वाल हे मीनाक्षी यांचे पती होत.

बात्रा याच्यावर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र प्रकृती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात हलविण्यात आले. गुरुवारी दुपारी पुन्हा सुरजला मूत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बात्रा हा खारघरमध्ये अनेकांना व्याजाने पैसे देत होता. या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर नफा कमावत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी खारघरमधील ‘सेलिब्रेशन’ इमारतीत राहणाऱ्या मीनाक्षी जयस्वाल यांची हत्या करण्यात आली होती. न्या. संतोष जयस्वाल यांनी दिलेल्या निकालामुळे त्यांच्या पत्नीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यात आले होते.

चोरी आणि व्याजाचे पैसे अशा दुहेरी उद्देशाने ही हत्या घडली होती. या हत्येतील मुख्य सूत्रधार सुरज होता. बात्रा हा रिअल इस्टेटच्या व्यवसायातही पैसा गुंतवून होता. अनेक बडय़ा पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये त्याची ऊठबस होती. त्यामुळे हत्या प्रकरणात काही सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी पोलिसांनी केली होती.