पंचवीस मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती शक्य; केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान

नवी मुंबई पालिकेच्या तुर्भे येथील क्षेपणभूमीवरील घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून चार सेल बंद करण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात मोकळी जामीन तयार झाली आहे. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोत्साहनपर अनुदानावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली असून त्याच्या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पंचवीस एकर जमिनीवर पंचवीस मेगावॉट सौरऊर्जा निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दिवसाला सातशे मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत असून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे. पालिकेचा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देश आणि राज्य पातळीवर नावाजला गेला आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून घेण्यात आलेल्या ८० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून बंद दगडखाणींचा हा भाग आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी अतिरिक्त ३६ एकर जमीन घेण्यासाठी पालिकेने शासनाला १०० कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. त्यामुळे ही जमीन आता १०० हेक्टरच्या घरात गेली आहे.

वीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या क्षेपणभूमीतील चार सेल पूर्ण झाले आहेत. त्या ठिकाणी घनकचऱ्याचे टेकडय़ा तयार झाल्या असून त्यातील दरुगधीयुक्त पाणी काढून टाकण्यात आले आहे. मात्र पावसाळ्यात या क्षेपणभूमीचा त्रास आजूबाजूच्या लोकवस्तीला व औद्योगिक वसाहतीला होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोपरखैरणे क्षेपणभूमीप्रमाणे एखादे उद्यान उभारणे शक्य नसल्याने पालिकेने या मोकळ्या जमिनीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

काही दिवसांनी या ठिकाणचा पाचवा सेल देखील बंद केला जाणार असून सहावा सेल लवकरच सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पाचव्या सेलमुळे आणखी जमीन मोकळी होणार आहे. या सर्व जमिनीचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली असून सौरऊर्जा प्रकल्पासाठी सल्लागार नेमला जाणार आहे.

कोटय़वधींची बचत

नवी मुंबई पालिकेच्या दिवाबत्ती आणि सार्वजनिक वापरात सुमारे ९० कोटी रुपयांचा वीज वापर केला जातो. पालिकेने हा वीज प्रकल्प उभा केल्यास या सार्वजनिक वापरापोटी पालिकेला द्यावे लागणारे कोटय़वधी रुपये वाचणार आहेत. पालिका ही वीज महावितरण कंपनीला हस्तांतरण केल्यास त्यांना या बिलात सवलत मिळणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या क्षेपणभूमीवर खूप मोठय़ा प्रमाणात मोकळी जमीन तयार होत आहे. या ठिकाणी लोकोपयोगी इतर प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे एक सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध असून त्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.

-सुरेंद्र पाटील,  शहर अभियंता, नवी मुंबई पालिका