लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : पनवेल पालिका प्रशासनाकडे कोणतेही धोरण नसल्याने शहरात फेरीवाल्यांप्रमाणे अपंगांनी मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या टपरीवजा व्यवसायाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. याबाबत सर्वेक्षण करण्याची माहिती विभाग अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाने दिली आहे.

पनवेलमध्ये फेरीवाल्यांप्रमाणे अपंगांनीही शहरातील मोक्याच्या जागांवर आपले व्यवसाय सुरू केले आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात पनवेल, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर रेल्वेस्थानके, वसाहतींचे मुख्य प्रवेशव्दार, शहरातील मुख्य चौक, मंडईचे प्रवेशद्वार आदी ठिकाणी सध्या अपंगांच्या टपऱ्या लावलेल्या दिसत आहेत. हे सर्व बेकायदा असल्याने पालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करते. मात्र याला अपंगांच्या संघटनांकडून विरोध होत असतो.

प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंगांना व्यवसाय करण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे यासाठी पालिकेकडे मागणी केली होती. १२ नोव्हेंबर रोजी याबाबत पालिका प्रशासनाबरोबर एका बैठकीत चर्चा झाली होती.

या चर्चेनुसार आता पालिका प्रशासनाने प्रभाग अधिकाऱ्यांकडे सर्वेक्षण करून अहवाल मागविला आहे. ऑक्टोबर २०१६ पूर्वी नगरपरिषद क्षेत्रात किती अपंग व्यवसाय करत होते. सध्या किती अपंग व्यवसाय करत आहेत याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती संकलित केल्यानंतर पालिका अपंगांच्या व्यवसायाविषयी धोरण ठरविणार असून त्यानुसार जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्त सुधारकर देशमुख यांनी सांगितले.

पनवेल पालिका क्षेत्रात साडेचार हजार अपंग आहेत. अनेकांना नोकरी नसल्याने टपरी करून व्यवसाय करीत आहेत. टपरी भाडय़ाने देत असेल तर त्यावर नक्कीच कारवाई करावी. फिरत्या स्टॉलचा प्रस्ताव ठेवला आहे. अपंगांसाठी पालिकेने सकारात्मक धोरण अवलंबले पाहिजे.

-बाबुराव काने, अध्यक्ष,  प्रहार अपंग क्रांती संस्था