पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे नमुने तपासणीसाठी

नवी मुंबई : ब्रिटनहून नवी मुंबईत परतलेल्या १४७ नागरिकांबाबत पालिका सतर्क असून त्यातील एकाची चाचणी सकारात्मक आल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या संशयित रुग्णाला तुर्भे येथे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनवरून नवी मुंबईत १४७ जण परतले आहेत. यातील अनेक प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यातील एक संशयित आढळला आहे.

ब्रिटनहून नवी मुंबईत १८ डिसेंबरला परतलेल्या एका महिलेची १९ डिसेंबर रोजी तसेच २५ डिसेंबर या दोन वेळा केलेली करोना चाचणी नकारात्मक आली होती. त्यानंतर पुन्हा तिची चाचणी एका खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यात ती करोना सकारात्मक आली. त्यानंतर पुन्हा पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता ती चाचणी नकारात्मक आली. परंतु या महिलेला सर्दीचा त्रास होत असल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे तिचा चाचणी अहवाल काय येतो याकडे पालिकेचे लक्ष लागले आहे. या महिलेच्या स्टेन करोनाबाबतची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्याला पाठविला आहे.

* ब्रिटनहून नवी मुंबईत परतलेले : १४७

* पालिकेच्या संपर्कात : ११३

* करोना चाचणी केलेले : ९८

* करोना सकारात्मक : १