13 November 2019

News Flash

हातगाडीवरून बॉम्बचा प्रवास 

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुधागड विद्यासंकुलाच्या कुंपणाकडे सेक्टर १ येथे बॉम्ब दिसला.

बारा तासांचा थरार; पोलिसांसह नागरिकांची कर्तव्यदक्षता

पनवेल : कळंबोलीतील शाळेजवळ बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही. पण १२ तासांच्या प्रयत्नांनंतर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निकामी करण्यात आलेल्या बॉम्बच्या स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर पोलिसांसह साऱ्यांनाच हादरा बसला. सोमवारी दुपारी हातगाडीवर आढळलेला बॉम्ब आधी पोलीस ठाण्यापर्यंत आणि नंतर निर्जन उद्यानात नेईपर्यंत कोणतीही विशेष खबरदारी न घेता झालेला प्रवास संबंधितांच्या डोळय़ांवर अलगद तरळून गेला.

कळंबोली वसाहतीची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुधागड विद्यासंकुलाच्या कुंपणाकडे सेक्टर १ येथे बॉम्ब दिसला.

या कुंपणावर सुधागड संस्थेने या शिका मोठे व्हा हा दादासाहेब लिमये यांचा सुविचार लिहिला आहे. याच सुविचाराच्या या शब्दासमोर बॉम्बची हातगाडी ठेवण्यात आली होती. शाळेजवळ चणे-फुटाणे विक्रीसाठी असणारे, खाऊ विक्रीसाठी आलेले हातगाडी व फेरीवाले शाळेसमोर उभे राहतात.

शाळेच्या वेळेत सुरक्षारक्षक व शिपाई त्यांना नेहमी हटकतात. कधीकधी पनवेल पालिकेचे पथक येथे कारवाईसाठी येते. मात्र सोमवारी शाळेचा पहिला दिवस

असल्याने पनवेल पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक येथे फिरकलेच नाही. बॉम्ब ज्या हातगाडीवर होता. या हातगाडीवर विक्रीसाठी आलेला माल असल्याच्या शक्यतेने गोकुळ कुंभार व अरुण विश्वकर्मा या सुधागडच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीतून माल काढून पाहिला. अनेक वस्तू उचकटल्यावर हे काहीतरी वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापक इकबाल इनामदार यांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर ती हातगाडी ढकलत ढकलत शाळा ते पोलीस ठाणे असा बॉम्बचा प्रवास हातगाडीवरून सुरू झाला. विशेष म्हणजे नागरिवस्तीतून आशाप्रकारे बॉम्बचा हातगाडीवरून प्रवास ही पहिलीच घटना असावी. त्यानंतर नवी मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकाच्या ‘मेटलडिटेक्टर’मधून ही संशयास्पद वस्तू कळू न शकल्याने यामध्ये घातक रसायन असल्याची शक्यता काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविल्यानंतर प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हा बॉम्ब ठेवण्याऐवजी मोकळ्या जागेत नेऊन निकामी करण्याची शक्कल लढविण्यात आली. त्यामुळे पोलीस ठाण्याजवळचे उद्यान हे ठिकाण त्यासाठी निवडण्यात आले. पुन्हा बॉम्बचा प्रवास पोलीस ठाणे ते उद्यान असा करण्यात आला. याच उद्यानाशेजारी मोठे जलकुंभ असल्याने बॉम्बचा स्फोट झाल्यास त्यावर पाण्याचा मारा करता येईल अशीही शक्कल काही पोलिसांनी लढविली. घटनास्थळी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. एकीकडे बॉम्ब पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची संख्या उद्यानाशेजारी वाढत चालली असताना नवी मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकाने संबंधित बॉम्बच्या परीक्षणासाठी बॉम्ब हाताळणी सुरू केली होती. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. नवी मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील जवानांकडे बॉम्बचे परीक्षण करण्यासाठी बॉम्बरोधक जॅकेट राज्य सरकार देऊ शकले नाही. त्यामुळे असलेल्या उपलब्ध सुरक्षेच्या साहित्यामध्ये हे जवान बॉम्बचे परीक्षण करत होते. राज्य सरकारने मुंबई येथील बॉम्बशोधक पोलीस दलातील काही जणांसाठी ही बॉम्बरोधक जॅकेट खरेदी केल्याचे समजते. नवी मुंबई दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावत बॉम्बची तपासणी सुरू केली. तोपर्यंत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांसहित डझनभर उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी याच उद्यानात बॉम्बचे परीक्षण केले. मात्र बॉम्बच्या सिमेंटच्या खोक्याला तीन इंचापर्यंत छिद्र पाडल्यानंतरही कोणतीही माहिती मिळत नसल्याने अखेर हे प्रकरण पुणे येथील सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रातील स्फोटक विभागाला सुपूर्द करण्यात आले. या विभागाच्या पाचारणानंतर संबंधित बॉम्बला एका तीनचाकी टेम्पोमध्ये त्यावर वजन ठेवून ते निर्जनस्थळी रात्री दहा वाजता निकामी करण्यासाठी नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता निकामी करताना झालेल्या स्फोटाच्या आवाजानंतर अनेकांना या जिवंत बॉम्बची वरात हातगाडीवरून काढल्याचे स्मरण झाले.

बॉम्ब शोधकयंत्राची वानवा

दोन महिन्यांपूर्वी पनवेल तालुक्यातील एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब, त्यानंतर खोपटा गावाजवळील लिहिलेला दहशतवादाचा संदेश आणि सोमवारी विद्यालयालगत सापडलेला बॉम्ब या तीनही घटना पनवेल व उरण या परिसरात घडल्या आहेत. तीनही घटनांमागे खरे सूत्रधार कोण याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र ज्या हातांना याचा शोध घ्यायचा आहे त्या जिवांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न सोमवारी बॉम्ब हाताळण्यात आलेल्या अवस्थेकडे पाहिल्यावर उभा ठाकतो. एखाद्या वस्तूमध्ये बॉम्ब आहे की नाही हे ओळखणारे शोधकयंत्रच नवी मुंबई पोलीस दलाकडे नाही. बॉम्बरोधक जॅकेट एखादी दुर्घटना घडल्यावर मुख्यमंत्री खरेदी करणार का? अशी चर्चा मंगळवारी पोलीस दलात सुरू होती. पोलिसांनी नागरिकांची सुरक्षा केलीच पाहिजे मात्र

यासाठी पोलिसांच्या सुरक्षेसाठी सुसज्ज यंत्रणा देण्यासाठी सरकारला दुर्घटनेचा मुहूर्त शोधावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

First Published on June 19, 2019 3:51 am

Web Title: suspected explosive spotted on a handcart in kalamboli