अकरा इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित; रहिवाशांचा तीव्र विरोध

न्यायालयाने धोकादायक इमारतींत दुर्घटना घडल्यास पालिकेला जबाबदार धरल्यानंतर आज-उद्या करीत अखेर पालिकेने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात वाशीतील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली. अकरा इमारतींचे वीज व पाणी पुरवठा खंडित केल्यानंतर वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर कारवाई स्थगीत करण्यात आली.

वाशी सेक्टर ९ येथील उत्कर्ष सोसायटीतील १, गुलमोहर सोसायटीतील ७, आशीर्वाद सोसायटीतील ३ अशा अकरा अतिधोकादायक इमारतीमधील वीज व पाणीपुरवठा पोलीस बंदोबस्तात खंडीत करण्यात आला. यावेळी रहिवाशांनी तीव्र विरोध केला. यावेळी प्रचंड असंतोष, रडारड, आक्रोश रहिवाशांनी केला. यामुळे वाशीतील वातावरण तापले होते. रहिवाशांनी यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला. या कारवाईनंतर नवी मुंबईतील अतिधेकादायक इमारती व शहरातील पुनर्वसन यावरून वातावरण पेटणार आहे.

शहरातील धोकादायक इमारतींची संख्या ही वर्षांनुवर्षे वाढतच आहे. २०१९-२० या वर्षांतील धोकादायक इमारतींचे  पालिकेने विभागवार सर्वेक्षण केले असून पालिका क्षेत्रात ४४३ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित केल्या आहेत. यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित सी १ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५५ इमारती आहेत. त्यातील राहण्यास अयोग्य असलेल्या व कोणत्याहीक्षणी दुर्घटना घडू शकेल अशा २३ इमारती खाली करण्यासाठी पालिका प्रशासन गेली काही महिने प्रयत्न करीत आहे. अनेकदा ‘इमारती खाली करा’ अशा नोटीसा या रहिवाशांना दिल्या. मात्र घरे खाली करून आंम्ही जायचे कुठे? असा प्रश्न असल्याने या धोकादायक इमारतीतच रहिवासी राहत आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने या इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही पालिकेने ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोध झाल्याने कारवाई झाली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेत शुक्रवारी कारवाई सुरू केली.

सर्वप्रथम उत्कर्ष इमारतीतील एका इमारतीचा पाणी व विद्युत पुरवठा खंडीत केला. यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर गुलमोहर इमारतीमध्येही पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेक महिलांनी ‘आता आम्ही जायचे कुठे’ असा सवाल करीत रडारड केली. आशीर्वाद सोसायटीतील कारवाई करुन अधिकारी व पोलीस सुवर्णसागर सोसायटीकडे कारवाईसाठी जात असताना अचानक वरिष्ठांकडून पोलीस व पालिका अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याचे आदेश मिळाले.

एकता, कैलास, सुवर्णसागर, श्रध्दा या सोसायटय़ांमधील १२ इमारतींवर कारवाई शिल्लक आहे.

वाशी येथे पोलीस संरक्षणात कारवाई सुरु असताना या इमारतींमधील अनेक रहिवाशा पालिकेवर धडकले. त्यांनी अधिकारी व महापौर यांची भेट घेऊन ‘आम्ही जायचे कोठे’ अशी विनवणी केली.

पालिकेच्या कारवाईबाबत सभागृहात आवाज उठवून कारवाई स्थगित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री व सिडको यांना पत्र देत नागरिकांना तात्पुरत्या सिडकोच्या घरांमध्ये हलवा. तसेच तत्काळ पुनर्वसनासाठी पालिकेने बांधकाम परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

-मंदा म्हात्रे, आमदार

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. उर्वरित कारवाईही पूर्ण करण्यात येईल. नागरिकांनी ‘आम्ही जबाबदार राहू’ असे लिहून दिले आहे. मात्र दुर्घटना घडल्यास काही किंमत राहणार नाही. त्यामुळे कारवाई ही होणारच आहे.

-डॉ.रामास्वामी एन. आयुक्त नवी मुंबई महापालिका