‘स्वच्छ भारत’च्या नव्या निकषांमुळे नवी मुंबईचे

सार्वजनिक शौचालये, जनतेच्या सहभागासाठी असलेल्या गुणांमध्ये करण्यात आलेला बदल आणि ग्रामीण भागांत मलनि:सारण वाहिन्यांचे तयार करण्यात येणारे जाळे यामुळे पुढील वर्षी होणारे स्वच्छ भारत सर्वेक्षण नवी मुंबई महापालिकेला फायदेशीर ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गतवर्षी झोपडपट्टी व ग्रामीण भागांतील मलनि:सारण प्रक्रियेअभावी पालिकेला देशात आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यात सुधारणा करून अव्वल स्थान मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाऊले उचलली आहेत.

यंदा जानेवारीत झालेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईने देशात आठव्या व राज्यात पहिल्या क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेत इंदौर शहराने बाजी मारून देशात पहिला क्रमांक मिळविला होता. नवी मुंबई पालिकेने सप्टेंबपर्यंत केलेल्या अनेक उपाययोजना आणि स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे बदलेले निकष यामुळे यंदा जानेवारीत होणाऱ्या सर्वेक्षणात बाजी मारण्याची संधी नवी मुंबईला प्राप्त झाली आहे.

जनतेचा सहभाग या निकषाला यापूर्वी केवळ १०० गुण ठेवण्यात आले होते. ते आता वाढवून २०० करण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेने सार्वजनिक शौचालयांचे लक्ष्य पूर्ण केले असून शहर हगणदारीमुक्त केले आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे नवी मुंबईतील रस्ते, उड्डाणपूल, चौक चकाचक केले जात आहेत. याचा फायदा जानेवारीतील सर्वेक्षणात होणार आहे.

याशिवाय काही गृहनिर्माण सोसायटय़ांनी राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया केंद्रामुळे सर्वेक्षणात या गुणांची भर पडणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छ भारत स्पर्धेत नवी मुंबईला अव्वल येण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागांत सुधारणा

ग्रामीण भागांत मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता असल्याने पालिकेला मागील सर्वेक्षणात कमी गुण मिळाले होते. त्यामुळे येत्या काळात गावात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी पालिका सहा कोटी रुपये खर्च करण्यास तयार असून गावातील मलनि:सारण वाहिन्यांवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. या सर्व प्रयत्नांचा फायदा नवी मुंबईचे स्वच्छ शहरांतील स्थान उंचावण्यासाठी होणार आहे.

स्वच्छता ही चळवळ ठरावी!

  • महापौर सुधाकर सोनावणे यांचे आवाहन

नवी मुंबई सध्या देशातील सर्वात स्वच्छ शहरांत आठव्या क्रमांकावर आहे. यापुढे स्वच्छता मिशन ही एक चळवळ म्हणून हाती घेऊ या आणि जागरूक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यावर भर देऊ या. आपले शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरावे यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जानेवारी २०१८ मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी पालिका सभागृहात मंगळवारी एक कार्यशाळा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक आणि अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले, ‘स्वच्छ शहरांच्या क्रमवारीतील नवी मुंबईचे स्थान उंचावण्यासाठी आपण सज्ज आहोत. नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नवी मुंबईकराने यात भाग घ्यावा. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि सोसायटीस्तरावरच कचऱ्यावर प्रक्रिया करावी. त्यासाठी स्थानिक पातळीवर नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेच्या या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सोसायटय़ा, शाळा- महाविद्यालये, रुग्णालये व प्रभाग पातळीवरही स्वच्छतेविषयी निकोप स्पर्धा आयोजित करण्यात येतील.’

नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के म्हणाल्या, ‘मागील वर्षी ४३६ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली होती. यावर्षी ४ हजारहून अधिक शहरे सहभागी होण्याची शक्यता आहे, तरीही देशात पहिला क्रमांक मिळविणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. नवी मुंबई स्वच्छता मिशन समितीमार्फत स्वच्छतेविषयी विभागनिहाय निरीक्षण करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका या दृष्टीने कृती आराखडा तयार करत आहे.’ स्वच्छतेविषयी जाणीव जागृती करणाऱ्या या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आयोजित या कार्यशाळेस नगरसेवक  बहुसंख्येने उपस्थित होते.

माहितीपट, प्रदर्शन..

यावेळी स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष वृषाली मगदुम यांनी कचरा वर्गीकरणाबाबत माहिती दिली. तसेच ‘कचऱ्याची गोष्ट’ या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत संघटनेने तयार केलेल्या उपयोगी साहित्याचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देऊन नगरसेवकांनी साहित्याची माहिती व कार्यपद्धती जाणून घेतली.