प्राथमिक संरचना परीक्षणाचा अहवाल, रहिवाशांवर संकट

दोन मजल्यांचे स्लॅब कोसळल्यामुळे सील करण्यात आलेली स्वप्नसाकार इमारत राहण्यास अयोग्य असल्याचे प्राथमिक संरचना परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. या इमारतीतील रहिवाशांच्या डोक्यावरचे छप्परच नाहीसे झाल्याने ते संकटात सापडले आहेत.

नवी मुंबईतील बेलापूर विभागातील दारावे गाव येथील सेक्टर २३ येथे असलेल्या या इमारतीच्या पहिल्या आणि तळमजल्यावरील घराचे स्लॅब बुधवारी कोसळले, त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे पालिकेने इमारतीत राहण्यास मनाई केली होती. इमारतीचे संरचना परीक्षण केले असता, इमारत राहण्यास सुरक्षित नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आता कुठे राहायचे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

येथे ए आणि बी विंग असून बी विंगमध्ये दुर्घटना घडली होती. त्यामुळे पालिकेने ए विंगमधील रहिवाशांना त्यांचे हलके सामान इमारतीबाहेर काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली भांडी, कपडे व इतर सामान बाहेर काढले आहे. गेले दोन दिवस बेलापूर आग्रोळी येथील रात्र निवारा शिबिरात येथील रहिवाशांची राहण्याची सोय करण्यात आली होती. परंतु आता इमारतच राहण्यास योग्य नसल्याने पालिकेने रहिवाशांना आपापली राहण्याची सोय करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी मोठय़ा संकटात सापडले आहेत. ज्या दोन घरांचे स्लॅब कोसळले त्यांचे सामान, महत्त्वाची कागदपत्रे व गरजेच्या वस्तू मिळत नसल्याने आता काय करायचे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. इमारतीचे बांधकाम  १९९६मध्ये करण्यात आले. इमारत २००० मध्ये बांधून पूर्ण झाली.

इमारत राहण्यायोग्य नसल्याने नागरिकांना हलके सामान बाहेर काढण्यास सांगीतले आहे.मोठे सामान काढताना धक्का लागल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची रात्रनिवारा केंद्रात तात्पुरती सोय केली होती.

-शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर

‘स्वप्नसाकार’मध्ये १६ घरे व चार दुकाने आहेत. आता कुठे जावे, असा प्रश्न पडला आहे. शनिवापर्यंतच रात्रनिवाऱ्यात राहता येणार आहे.

-ए. डी. शिंदे, अध्यक्ष, स्वप्नसाकार सोसायटी

घरातील हलके सामान काढण्याची परवानगी दिली आहे. ज्या बी विंगमध्ये दुर्घटना घडली तिथे जाऊही दिले जात नाही. खूप हाल होत आहेत.

-कृष्णा ननावरे, सचिव, स्वप्नसाकार सोसायटी