स्वराज्य को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, सेक्टर-१० ऐरोली

गडकिल्ल्यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी, यासाठी संस्थेच्या मदतीने गडकिल्ल्यांची डागडुजी ऐरोली सेक्टर- १० मधील स्वराज्य को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी करीत असते.   ‘स्वराज्य’ संकुलातील लहान मुले व तरुण यासाठी मेहनत घेत असतात.

१९९५ साली सिडकोने बांधलेली ‘स्वराज्य’ची उभारणी केली. स्वराज्यच्या संकुलात सहा इमारती. बी-१ ते बी-६ असे क्रमांक. प्रत्येक इमारतीत १६ खोल्या अशी एकूण ९६ कुटुंबे. ‘वन आरके’ रूपात घरांची रचना करण्यात आली. सध्या एफएसआयनुसार वन बीएचके जागा इमारतीतील सभासदांना वापरण्यास उपलब्ध आहे.

संकुलात आंबा, शेवगा, बदाम आणि नारळाच्या झाडांची रांग आहे. वृक्षांच्या खोडांभोवती सीमेंटचे कठडे बांधण्यात आले आहेत. यातील काही वृक्षांची पूजाही केली जाते. यातील एका झाडाभोवती रहिवाशांनी लोखंडी देव्हारा तयार केला आहे. संकुलाच्या दर्शनी भागात तुळस लावण्यात आली आहे.

संकुलात दुचाकी आणि चारचाकीसाठी पार्किंगची खास सोय करण्यात आली आहे. इमारतीच्या मध्यवर्ती मोकळ्या भागात चारचाकी तर उजव्या बाजूला दुचाकी वाहने उभी करण्याची सोय करण्यात आली आहे. आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

रहिवासी ओला आणि सुका कचरा वैयक्तिक पातळीवर वेगळ्या करण्याची सूचना देण्यात आली आहे. विजेच्या बचतीसाठी एलईडी बल्ब आवारात लावण्यात आले आहेत. महापालिकेकडून सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा होत असला तरी आवारात भूमिगत टाकीची सोय करून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येतो.

संकुलात बांधण्यात आलेल्या कार्यालयाबाहेरील जागेत ओटा बांधून विविध वृत्तपत्रे ठेवण्यात आली आहेत. वृत्तपत्रांची जबाबदारी संकुलातील प्रत्येकाने उचलली आहे. दरवर्षी संकुलात सत्यनारायणाची पूजा बांधली जाते. या वेळी मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या वेळी स्पर्धेमुळे कोणतीही नकारात्मक भावना निर्माण होऊ नये यासाठी यशस्वी स्पर्धकांना समान रकमेची बक्षिसे वाटण्यात येतात.

शिवजयंतीला रहिवासी एखाद्या संस्थेच्या सहभागातून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. याशिवाय कोजागिरी, तुळशीविवाह, होळी, गरबा आणि दहीहंडी सण साजरे केले जातात. दिवाळीत सर्व रहिवाशांना समान आकाराचे कंदील वाटण्यात येतात.

शिवकालीन किल्ले बनविण्यासाठी रहिवासी मुलांना खास प्रोत्साहन दिले जाते. किल्लेदर्शन स्पर्धेत संकुलाच्या किल्ल्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. श्रीमंत योगी प्रतिष्ठान, गड किल्ले स्पर्धा, शिवसेना पक्ष आयोजित किल्ला स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय राखी उत्सव २०१४ स्पर्धेत सोसायटीतील महिलांनी सादर केलेल्या सामाजिक नाटकांना पारितोषिके मिळाली आहेत.  सोसायटीतील इमारतींचा विमा उतरविण्यात आला आहे.