पालिकेकडून रखडलेल्या मोठया प्रकल्पांना गती; वाशी स्थानकाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

संतोष जाधव
नवी मुंबई : करोनामुळे शहरातील महत्त्वाचे व मोठे प्रकल्प रखडले होते. मात्र आता करोनाच्या नियोजनाबरोबर पालिका प्रशासनाने या प्रकल्पांना गती दिली आहे. नुकतेच नेरुळ येथील विज्ञान केंद्राच्या कामाचे आदेश

दिल्यानंतर आता रखडलेला ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव व वाशी येथील एनएमएमटी बस स्थानकावरील व्यावसायिक संकुलाच्या कामाचे आदेश दिले आहेत. तरणतलाव पुढील दोन वर्षांत खेळांडूसाठी सरावासाठी उलब्ध होईल, असे नियोजन आहे.

२०२३ पर्यंत शहरात ऑलिम्पिक दर्जाचा पहिला तरणतलाव निर्माण होणार असून त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरातील खेळाडूंना जलतरणासाठी शहराबाहेर जावे लागत होते, ती समस्या दूर होणार आहे. तसेच घणसोली यथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल होणार आहे. यामुळे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू भविष्यात तयार होणार आहेत. तरणतलावाच्या महत्त्वपूर्ण कामाला कार्यादेश दिला असून ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपातील कामाला सुरुवात केली आहे. हा तरणतलाव वाशी सेक्टर १२ येथे करण्याचे नियोजित होते.

या महत्त्वपूर्ण कामासह ‘एनएमएमटी’चे बसस्थानक तसेच वाणिज्य संकुलही रखडले होते. या कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. यासाठी अंदाजित १२४ कोटी खर्च अपेक्षित होता. नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने परिवहन उपक्रमाला आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी शहरातील परिवहनच्या बसस्थानकांचा वाणिज्यिक वापरासाठी जास्तीत उपयोग करून त्यातून परिवहन उपक्रमाला

आर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. एकीकडे वाशी सेक्टर १२ येथील भूखंड क्रमांक १९६ व १९६ अ या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव, बसस्थानक तसेच वाणिज्य संकुल आकारस येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

वाशी येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलावही शहरासाठी ओळख ठरणार आहे. या ठिकाणी परिवहनचा बसस्थानक तसेच वाणिज्य संकुल उभा राहणार असून एकीकडे खेळासाठी आंतर क्रीडा संकुल व ऑलिम्पिक दर्जाची सुविधा तर दुसरीकडे परिवहन उपक्रमाला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे वाणिज्य संकुल उभारले जाणार आहे. पुढील काळात परिवहन उपक्रमाला आर्थिक सक्षमता प्राप्त होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.

अभिजीत बांगर, आयुक्त

१६७,६३,५२,४०३ रु.

कामाचा खर्च

२४ महिने

(पावसाळ्यासह) कामाचा कालावधी

१७.६.२०२३

काम पूर्णत्वाचा कालावधी

’ ठेकेदार- मे.कल्पना स्ट्रक-कॉन प्रा.लि.

नवी मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव झाल्यास शहरात चांगली सुविधा निर्माण होईल व चांगले खेळाडू निर्माण होतील.

शुभम वनमाळी, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू