नवी मुंबईत ४, पनवेलमध्ये ८ रुग्ण

पाऊस सुरू होताच स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. सध्या पनवेलमधील विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूची लागण झालेले आठ रुग्ण उपचार घेत आहेत. परिसरात १९ संशयित रुग्ण आढळले होते, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पळस्पे, करंजाडे, कामोठे, खारघर व नवीन पनवेल या परिसरामध्ये स्वाइन फ्लूची साथ बळावण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

पनवेलमधील दवाखाने व रुग्णालयांनी पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयाला स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि संशयित रुग्णांची माहिती तात्काळ द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. पनवेलमध्ये येत असलेले गढूळ पाणी आणि टँकरमधून होणारा अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे काविळीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नळाला येणारे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून सार्वजनिक ठिकाणी खोकणे, शिंकणे यामुळे तो पसरण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी खोकताना आणि शिंकताना हातरुमालाचा वापर करावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे.

पुरेशी झोप घ्यावी, सकस आहार घ्यावा आणि ताप आल्यास दुर्लक्ष न करता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे. स्वाइन फ्लू हा रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या म्हणजेच वृद्ध व्यक्ती, बालक, गर्भवती महिला, मधुमेहचे रुग्ण, रक्तदाबाचे रुग्ण यांना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नवी मुंबईत स्वाइन फ्लूचे चार रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण बरे झाले असून दोघांवर  वाशीतील पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेरुळ, ऐरोली, सीवुड्समध्ये लागण

नवी मुंबई पालिकेची २७ तपासणी केंद्र आणि २२ नागरी आरोग्य केंद्र आहेत. ३ रुग्णालये आणि १ माता बाल रुग्णालय आहे. त्यात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांपैकी २० स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण होते. त्यांच्या रक्ताचे नमूने मुंबईतील हाफकिन संस्थेत पाठवले असता ४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी २ नेरुळ येथील रहिवासी आहेत. ऐरोली आणि सीवूड येथेही प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

पनवेलमध्ये लस उपलब्ध नाही

सरकारकडून ज्या स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्यात येतो, ती सध्या पनवेलमध्ये उपलब्ध नाही. ती लवकरच उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. रायगडच्या शल्यचिकित्सकांकडून पनवेलमध्ये औषध पुरवठा केला जातो. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीच्या शिल्लक साठय़ातील लसी १५० गर्भवतींना देण्यात आल्या आहेत. एन ९५ मास्क पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलांना व नागरिकांना देण्यात येणारे स्वाइन फ्लूचे औषधही पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे, अशी माहिती पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

ठाण्यात चार दिवसांत तिघांचा मृत्यू

ठाणे शहरात मंगळवारी ‘स्वाइन फ्लू’चे २१ रुग्ण आढळले आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये तीन जणांचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनाही या आजाराची बाधा झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संपूर्ण शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १३३ रुग्ण आढळले असून त्यांपैकी ४ रुग्ण महापालिका क्षेत्राबाहेरील होते. या १३३ पैकी ७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या सातपैकी तीन रुग्ण अवघ्या चार दिवसांपूर्वी दगावले आहेत.