News Flash

उद्योगविश्व : आधुनिक धोबीघाट

चित्रपट उद्योगातील चांगले कपडे धुण्यासाठी या आधुनिक लॉन्ड्रीचा आधार घेतला जात आहे.

 

उद्योजक : झुल्फिकार धामसे

मुंबईतील धोबीघाटाचे दृश्य जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये हमखास पाहायला मिळते, मात्र आता तो काळ सरला आहे. कपडे धुण्याच्या अनेक नावीन्यपूर्ण पद्धती प्रचलित झाल्या असून त्यात युरोपियन पद्धतीला जास्त महत्त्व दिले जात आहे. युरोपमधील कपडय़ांची गुणवत्ता जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक तयार कपडे विकणाऱ्या नामांकित कंपन्या या नाजूक पण आधुनिक धोबीघाटाला प्राधान्य देत असून यात स्विस लॉन्ड्रीने एक विश्वासार्ह नाव निर्माण केलेले आहे. त्यामुळेच हा सेवा उद्योग अलीकडे कोटय़वधीची उलाढाल करू लागला असून तेवढीच रोजगारनिर्मितीही करीत आहे. कंपनीचे मालक झुल्फिकार धामसे यांच्याशी केलेली चर्चा..

युरोपमध्ये यंत्राद्वारे कपडे धुण्याच्या अनेक पद्धती आहेत. यात इटलीतील कपडे धुण्याच्या यंत्रणेला जगात मागणी आहे. त्यात रणजेस्सी, इटाक्लीन, युनिसेक, या पद्धतीला जास्त मान्यता आहे. त्यामुळेच ‘स्विस लॉन्ड्री’ने ही संकल्पना २०१२ मध्ये भारतात प्रत्यक्षात प्रथम कोलकात्यात आणली. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे ‘बुभा’ हे रसायनही जर्मनीवरून आयात केले जात आहे. ‘स्विस लॉन्ड्री’ने देशातील कोलकाता, रायपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई आणि अलिबाग यासारख्या ठिकाणी लॉन्ड्री सुरू केलेल्या आहेत. यात महाराष्ट्रातील संचलन ‘रायझिंग इंटरप्राईजेस’कडे आहे. रेमंड, ल्युमिनर, अरमानी, गुस्सी यासारखे ब्रॅन्ड कपडे उत्पादन कंपन्या या ‘स्विस लॉन्ड्री’चे ग्राहक आहेत.

भारताच्या एक माजी पंतप्रधानांचे कपडे स्वातंत्र्यपूर्व काळात स्विसमध्ये धुण्यासाठी दिले जात असत. देशातील एक वर्ग चांगलाच श्रीमंत आहे. त्यामुळे हजारो लाखो रुपयांच्या कपडय़ांचीही तेवढीच काळजी घेतली जात आहे. बडय़ा उत्पादन कारखान्याची दालने ग्राहकांना स्विस लॉन्ड्रीमध्येच कपडे धुण्याचा सल्ला देतात यावरून या आधुनिक धोबीघाटाची विश्वासार्हता अधोरेखित होत आहे.

चित्रपट उद्योगातील चांगले कपडे धुण्यासाठी या आधुनिक लॉन्ड्रीचा आधार घेतला जात आहे. ब्रॅन्ड कपडय़ांचे डिझायनर विशाल कपूर, पॉल सिंग, रितू कुमार, दासगुप्ता यांनी चित्रपट नायक नायिकांसाठी तयार केलेले कपडेही धुण्यासाठी या ‘स्विस लॉड्री’मध्ये पाठविले जात असतात. हा एक सेवा उद्योग असल्याने कपडे जागेवरून उचलण्यापासून ते पुन्हा त्याच ठिकाणी पोहचविण्यापर्यंत ही सेवा दिली जात आहे.

कपडे आणल्यानंतर ड्राय क्लीनिंग, वेट क्लीनिंग, स्टीम प्रोसेसिंग, गारमेंट एअर अशा अनेक प्रक्रियेद्वारे हे कपडे स्वच्छ केले जातात. यात आता हायड्रोकार्बन तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे. पर्यावरण पोषक हे धोबीघाट अलीकडे अनेकांना पसंत पडू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीही घरातील काही महत्त्वाचे कपडे या आधुनिक लॉन्ड्रीमध्ये वर्षांला एकदा तरी धुऊन घेत आहेत. कंपनी मालक झुल्फीकार धामसे यांनी वर्षभरात या सेवा उद्योगात चांगलीच भरारी घेतली आहे.  त्यासाठी त्यांनी या उद्योगाचे मुख्यालय नवी मुंबईत तुर्भे येथे ठेवले आहे. याच शहरातून इतर शहरातील सेवा उद्योगाची सूत्रे हलविली जातात. देशात विविध ठिकाणी सुरू केलेल्या सेवा उद्योगामुळे ३०० तरुणांना रोजगार मिळालेला आहे, तर कंपनीची वार्षिक उलाढाल कोटय़वधीच्या घरात गेलेली आहे. या सेवा उद्योगात अलीकडे अनेक कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे मात्र स्विस लॉन्ड्रीने भारतीयांच्या ब्रॅन्ड कपडय़ांचा कब्जा घेतल्याचे दिसून येते.

उलाढाल ७० कोटींच्या घरात

जगात चीन नंतर तयार कपडय़ांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतातील या सेवा उद्योगाची उलाढाल ७७ लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे त्याला पर्यायी लॉन्ड्री उद्योगालाही भरभराटीचे दिवस आले आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यात हा स्विस लॉन्ड्रीचा उद्योग ७० कोटींच्या वर गेला आहे. यावरून या व्यवसायाचा आवाका, त्याचा विस्तार याची कल्पना करता येईल. काही तयार कपडय़ांत मोठय़ा प्रमाणात कलाकुसर केलेली असते. कपडे धुताना आणि इस्त्री करताना या कलाकुसरीला फार जपावे लागते, अन्यथा तिचे सौंदर्य नाहीसे होण्याची भीती असते. इटालियन यंत्रामध्ये ही सर्व काळजी घेतली जाते. त्यामुळे देशात या सेवा व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. उंची वस्त्रे परिधान करणारे या सेवेचा नियमितपणे लाभ घेऊ लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:00 am

Web Title: swiss laundry zulfikar dhamsay
Next Stories
1 उरणचे शेतकरी पुन्हा भूमिहीन
2 उत्साहाची घागर उताणी
3 नवी मुंबई परिवहन सेवेस पुरस्कार
Just Now!
X