अपघाती मृत्यूनंतर सहा जणांना जीवदान

रत्नागिरीतील तबलावादक रोहन दिनकर सावंत याचे बंगळुरू येथे अपघाती निधन झाल्यानंतर त्याचे अवयव दान करून कुटुंबीयांनी आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या अवयवदानामुळे सहा रुग्णांना जीवदान मिळाले आहे. रोहन हा प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाच्या कार्यक्रमात साथ देत असे.

गोवा येथील शांतादुर्गा मंदिरातील तबलावादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रोहन हा वडील दिनकर आणि तीन चुलत भावांसोबत खासगी वाहनाने तिरुमल्ला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला. दर्शन घेऊन परतताना २२ ऑगस्टला पहाटे अपघात झाला. बंगळुरूत प्रवेश करताना भरधाव ट्रकने अचानक ब्रेक मारल्यामुळे रोहनची गाडी ट्रकवर आदळली. त्यामुळे रोहनच्या डोक्याला जबर मार लागला. गाडीतील इतरांना किरकोळ दुखापती झाल्या. रोहनला जवळच्या सीएमआय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मृत्यूशी पाच दिवस दिलेली झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी रोहनची प्राणज्योत मालवली.

रोहनच्या शरीरावर कुठेही जखमा झाल्या नव्हत्या किंवा रक्तस्रावही नव्हता. मेंदूला जबर मार बसल्याने तो पाच दिवस कोमात होता. त्यामुळे त्याला कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर रवी वर्मा यांनी रोहनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत. अखेर रोहनच्या इच्छेनुसार त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याचे वडील दिनकर व आई सोनल सावंत यांनी घेतला. त्यामुळे रोहनचे डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांचे दान करण्यात आले. त्यातून सहा रुग्णांना जीवदान मिळाले.

उत्तम कलाकार

रोहन एक उत्तम कलाकार होता. रत्नागिरीच्या जीजीटीएस शाळेत शिकत असताना तो केवळ तबला शिकण्यासाठी दर शनिवार-रविवारी मुंबईतील अल्लारखा अकॅडमीमध्ये जात असे. पंडित अरिवद मुळगावकर यांच्या तालमीत त्याने तबल्याचे धड गिरवले होते. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तो मुंबईत तबलावादन शिकू लागला, असे त्याचे काका विनायक सावंत यांनी सांगितले. तबला वादनाबरोबरच पोहणे आणि नेमबाजीचीही त्याला आवड होती. नुकतेच त्याने नेमबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. आर. डी बर्मन यांचे ऱ्हिदम अरेंजर स्वर्गीय मारुतीराव कीर यांचा तो नातू होता. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात त्याने आशा भोसले यांनाही तबल्याची साथ दिली होती.