आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्यास पाणी आणि वीजपुरवठा खंडित

मुंबईमधील कमला मिल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पालिका आणि नगरपालिका हद्दीतील उपाहारगृह, हॉटेल, बार आणि पब यांची तपासणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. नवी मुंबई पालिका प्रशासनाने विभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील उपाहारगृहाची तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या उपाहारगृह, बार, पब यांच्याकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही त्यांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहेत. बेलापूर व नेरुळ येथील काही बेकायदेशीर बांधकामे केलेल्या उपाहारगृहावर कारवाई करण्यात आलेली आहे.

मागील आठवडय़ात मुंबईत घडलेल्या कमला मिल आग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील उपाहारगृह, बार, रेस्टॉरंट आणि पब यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल, नवी मुंबई पालिकेने शहरातील सर्व उपाहारगृहाची तपासणी सुरू केली आहे.

पनवेल पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी तर शहरातील सर्व हॉटेल मालकांना तंबी दिली आहे. ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय एकही हॉटेल सुरू न करता हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनीही शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या तपासणीत बेलापूर व नेरुळ येथे बेकायदेशीर बांधकामे आढळलेली १८ हॉटेलावर कारवाई करण्यात आलेली आहे. शहरातील अनेक हॉटेल मालकांनी मार्जिनल स्पेसचा वापर करताना बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमण केलेले आहे. पालिकेच्या कारवाईने यातील काही जणांनी ही बांधकामे काढून टाकण्यास सुरुवात केलेली आहे.

अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेल मालकांचा पाणी व विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेशही पालिका प्रशासनाने दिलेले आहेत. हॉटेल मालक विविध प्रकारचे परवाने घेऊन हॉटेल सुरू करीत असल्याने पालिकेच्या अखत्यारीत बेकायदेशीर बांधकाम व अग्निशमन दलाचा परवाना या दोनच बाबींकडे लक्ष देण्याची जबाबदारी असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. या व्यतिरिक्त पोलीस, उत्पादन शुल्क हे विभाग या हॉटेलमधील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात हुक्कापार्लर सुरू झालेले आहेत.  यासाठी कोळसा वापरण्यासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. अग्निशमन दलाची परवानगी घेतल्यानंतर पालिकेची जबाबदारी संपते मात्र याच हुक्कापार्लरमधून अमली पदार्थाचे सेवन केले जाते. त्याची तपासणी पोलिसांनी करून त्यांच्यावर बंदी घालण्याची आवश्यकता असताना पोलीस डोळेझाक करीत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

शहरातील सर्व हॉटेल, उपाहारगृह, बार, रेस्टॉरंट, पब यांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे.  अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र न घेणाऱ्या हॉटेल मालकांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून विद्युत पुरवठा खंडित करण्याची सूचना जारी केली जाणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका.