वाहतूक सुरक्षा नियमांची पायमल्ली; चार लाखांचा दंड

पावसाळ्यात वाहनाच्या देखभालीकडे लक्ष न देता वापर केल्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे दुर्घटना रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेचा विशेष तपासणी मोहीम सप्ताह पार पडला. या वेळी तीन हजार ९५२ वाहनांमध्ये विविध प्रकारचे दोष आढळून आल्याने चालकांकडून चार लाख १३ हजार ६३२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहनांच्या समोरच्या काचेवर वायपर नसणे, सदोष टायर, आरसे, हेडलाइट, इंडिकेटर, ब्रेक लाइट, अप्पर-डिपर लाइट, रात्रीच्या वेळेस प्रकाश परावर्तित करणाऱ्या पट्टय़ांचा वापर न करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन वाहनांना अपघात होण्याचे प्रकार अधिक घडतात. अशा वेळी वाहने या सर्व गोष्टींनी सुसज्ज ठेवल्यास सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.मुंबई वाहतूक शाखेने १ ते ६ जून या कालावधीत शहरात विविध ठिकाणी कर्मचारी तैनात करून ही कारवाई केली.  वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली. यासाठी वाहतूक पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. अपघात होऊ नये यासाठी चालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे यांनी सांगितले.

कारवाई करताना लांब पल्ल्याच्या आणि शहरातील कमी टप्प्यात प्रवास करणाऱ्या वाहनांचे वर्गीकरण करण्यात आले होते. त्यामुळे  ज्या  वाहनांमध्ये दोष आहे. त्या वाहनांवर कारवाई करताना अधिक वेळ खर्ची पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. जी वाहने लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी निघाली आहेत. त्या दोषी वाहनांमध्ये दोष आढळल्यास घटनास्थळीच पावती फाडून चलन देण्यात आले. त्यानंतर त्या वाहनांना पुढे जाऊ देण्यास परवानगी देण्यात आली. पावसाळ्यात वाहनांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.