कळंबोली आणि खारघर येथील सिडकोच्या उदंचन केंद्रातून वाया जाणारे आठ दशलक्ष लिटर पाणी जून महिन्यापर्यंत तळोजा येथील उद्योजकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्योगांसमोरील टंचाईवर मार्ग निघणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात पाणी वापरणारे १२०० ग्राहक आहेत. पाणी कपातीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे जानेवारी महिन्यापासून पाण्याचा हा प्रश्न मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांकडे तळोजातील उद्योजकांसाठी झटणाऱ्या तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (टीएमए) मांडला. मुख्यमंत्र्यांसमोर टीएमएच्या सदस्यांनी उदंचन केंद्रातील वाया जाणारे पाणी देण्याचे आवाहन केले होते. उद्योजकांच्या या मागणीला नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रापासून जवळ सिडकोचे कळंबोली व खारघर येथील उदंचन केंद्र आहेत. उद्योजकांनी कारखान्यात स्वखर्चाने विंधण विहिरी पाडून आणि पुन्हा त्या विंधन विहिरी जून महिन्यात बंद करण्याऐवजी सिडकोच्या उदंचन केंद्रातून वाया जाणारे पाणी टँंकरद्वारे घेण्याकडे पसंती दाखविली आहे.
या उपक्रमाचा प्रायोगिक तत्त्वांवर पहिला टँंकर औद्योगिक वसाहतीमधील दीपक फर्टिलायझर कंपनीत नुकताच घेतला गेल्याची माहिती टीएमएच्या सचिव जयश्री काटकर यांनी दिली.

सुमारे ३ ते ५ रुपयांना एक टँकर या दराने हे पाणी उद्योजकांना मिळण्याची शक्यता आहे. हे पाणी टँंकरच्या मार्फत वाहतूक करून तळोजा येथील उद्योजकांना पुरविले जाईल. सध्या औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर्स आणि व्ही. व्ही. एफ. या वसाहतीमधील सर्वाधिक पाण्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांनी हे पाणी घेण्याचे ठरविले आहे. हे पाणी शुद्धीकरण केल्यानंतर कंपन्यांमधील उद्याने, कूलिंग टॉवर आणि स्वच्छतागृहांमध्ये वापरले जाणार आहे. हे पाणी उद्योगांच्या वापरांत येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.