तळोजा कारखानदारांच्या चेहऱ्यावर काळजी

तळोजा औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या बंबांमध्ये सध्या दहा हजार लिटर पाणी आहे; पण भविष्यात दुर्दैवाने एखाद्या गोदामाला वा कारखान्याला आग लागलीच तर ती नियंत्रणात आणण्यासाठी दीड लाख लिटर पाण्याची गरज लागेल, हा झाला अंदाज; परंतु सध्या वस्तुस्थिती अशी आहे की, औद्योगिक वसाहतीतील ९३८ कारखान्यांसाठीच्या पिण्याच्या आणि उत्पादन निर्मितीच्या वापरासाठीच्या पाण्यात कपात करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात येत्या शनिवारी (१२ मार्च) औद्योगिक सुरक्षा अभियान तळोजात सुरू होत आहे. मात्र साठय़ाला पाणीच नाही, तर सुरक्षा कशाची आणि कशी करायची, असा सवाल कारखानदारांच्या चेहऱ्यावर उमटला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ९३८ कारखान्यांना पिण्यासाठी आणि उत्पादनात वापरण्यासाठी पाण्याची चणचण भासत असताना ४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविलेली औद्योगिक सुरक्षा रॅली तळोजामध्ये शनिवारी दाखल होत आहे. या रॅलीचे स्वागत कारखानदार करणार आहेत.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या सुरू असणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे आगीची एखादी घटना घडल्यास अग्निशमन दलाची चांगलीच दमछाक होत आहे. या दलाकडे असणाऱ्या दोन अग्निशमन बंबामधील १० हजार लिटर पाण्याच्या जिवावर हे जवान आगीशी दोन हात करतात. मात्र एखाद्या कारखान्याला किंवा गोदामाला लहानशी आग लागल्यावर ती विझविण्यासाठी कमीतकमी दीड लाख लिटर पाण्याची गरज या दलाला भासते. १२ वर्षांनंतरही या केंद्राला वॉटर बाऊजरची (पाण्याचा हौद) सोय होऊ शकली नाही. यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता असते. तळोजा अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय येथे आहे. मात्र ती अपुरी असल्यामुळे येथे एकाच घरात तीन ते चार जण राहतात. तळोजा परिसरात मोठय़ा इमारती नसल्यामुळे या केंद्राला आग विझविण्यासाठी लागणारी ४० व ५५ मीटर उंचीची शिडी मिळालेली नाही.

औद्योगिक सुरक्षा  रॅलीचा सांगता समारंभ तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये होणार आहे. टीएमए कार्यालयापासून ते असाही ग्लास कंपनीपर्यंत ही रॅली निघणार आहे. या रॅलीचे उद्घाटक राज्याचे कामगारमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते होणार आहे. रायगड जिल्ह्य़ातील उत्कृष्ट सुरक्षित कामगार व सुरक्षा अधिकाऱ्यांचा या रॅलीमध्ये मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते गौरव होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री विजय देशमुख, कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेवसिंह, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक जयेंद्र मोटघरे, नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.