पाणीकपात रात्री करण्याची उद्योजकांची मागणी

उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंधारण विभागाने केलेल्या पाणीकपातीचा थेट फटका तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ७५० कारखान्यांना बसला आहे. गुरुवार व शुक्रवारी पाणी येत नसल्याने येथील उद्योजक हैराण झाले आहेत. राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी या उद्योजकांना विंधणविहिरी खोदण्याचे दिलेले आश्वासनही फोल ठरले आहे. या निर्णयाची अधिसूचना निघत नसल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यावर उपाय म्हणून दिवसा पाणी देऊन रात्रीचे आठ तास पाणीकपात करण्याची मागणी या उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केली आहे.

९०० हेक्टर जमिनीवर वसलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधील साडेसातशे कारखान्यांना पाणी संकट भेडसावत आहे. या कारखान्यांना सुमारे ४५ लक्ष घन लिटर पाण्याची आवश्यकता आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी २५ नोव्हेंबरला या विभागाचा दौरा केला होता.

यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना २७ टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणीगळती होत असल्याने ही समस्या गंभीर झाली असल्याचे मान्य केले होते. मात्र ही गळती रोखण्यात एमआयडीसीला यश आलेले नाही.

या क्षेत्रात रासायनिक प्रक्रिया कारखाने व शीतगृह प्रकल्प मोठय़ा संख्येने असल्याने पाणी हा या प्रकल्पांसाठी महत्त्वाचा घटक आहे. पाण्याअभावी अनेक कारखान्यांची उत्पादने कमी होत आहेत.

दुसरीकडे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमालकांना सुगीचे दिवस आले आहेत. आठवडय़ातील सलग दोन दिवस पाणीकपात करण्याऐवजी रोज रात्री चार किंवा आठ तास पाणीकपात केल्यास उद्योगांना सकाळी पाणी मिळू शकेल, अशी सूचना उद्योजकांनी एमआयडीसीला केली आहे.