कोकण मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट वातानुकूलित तेजस एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी सीएसएमटीतून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यासाठी मध्य व कोकण रेल्वे प्रयत्नशील आहे. प्रवाशांना सोयीची पडेल, अशी वेळ निवडली जाणार असून तसा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे.

साधारण दिड महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाकडे तेजस एक्स्प्रेसची वेळ बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र नुकतीच तेजस एक्स्प्रेसची ताशी १२० किलोमीटर वेगाची चाचणी घेण्यात आल्यानंतर त्याच्या वेळापत्रकात काहीसा बदल करावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने प्रस्ताव पाठविण्यावर विचार केला जात असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी अशी तेजस एक्स्प्रेस मे, २०१७ मध्ये सुरू झाली. खानपान सेवा, एलसीडी टिव्ही स्क्रीन, हेडफोन अशा अनेक सुविधा या गाडीत आहेत. ही गाडी सीएसएमटी येथून पहाटे पाच वाजता सुटते आणि साडे आठ तासांचे अंतर पार करून करमाळी येथे पोहोचते. मात्र मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या गाडीकडे प्रवाशांनी पाठच फिरवली आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी रिकामी धावत असल्याने रेल्वेचे आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागते.

या गाडीला असणारे मोजकेच थांबे आणि सीएसएमटी येथून पहाटे पाच वाजता सुटण्याची असलेली वेळ हेच प्रवाशांचा प्रतिसाद न मिळण्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. कोकण व मध्य रेल्वेने या दोन्ही गोष्टींचा विचार करून गाडीला आणखी काही ठिकाणी थांबे देण्यास सुरूवात केली आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तरीही गाडीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

गाडीची सीएसएमटी येथून सुटण्याच्या असलेल्या वेळेमुळेही प्रवाशांची गैरसोय होऊन पहाटेच स्थानक गाठावे लागते. सीएसएमटी येथून सुटलेली तेजस एक्सप्रेस दादर येथे अवघ्या दहा मिनिटांत तर दादर येथून सुटताच अवघ्या २० ते २५ मिनिटांत ठाणे येथे पोहोचते. त्यामुळे भल्या पहाटे सुटणारी एक्सप्रेस पकडण्यासाठी मुंबईतील प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते. एकंदरीतच प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी  सीएसएमटी येथून सुटण्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटे पाच ऐवजी त्यानंतरची वेळ निवडण्यात आली आहे.