24 October 2020

News Flash

‘तेजस्विनी’ बसगाडय़ांचे आगमन लांबणीवर

राज्य शासनाच्या निर्देशानुसार या बसगाडय़ा महिला चालक व वाहक चालवणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

विकास महाडिक

स्वयंचलित गिअरच्या बस उपलब्ध नसल्यामुळे विलंब

राज्यातील प्रमुख शहरांतील नोकरदार महिलांचा प्रवास सुखकराक व्हावा यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘तेजस्विनी’ बसगाडय़ांचे आगमन लांबणीवर पडले आहे. स्वयंचलित गिअरच्या बस उपलब्ध नसल्यामुळे विलंब होत आहे. या बसगाडय़ा गेल्या महिन्यात नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ताफ्यात दाखल होणार होत्या. उपक्रमाच्या कार्यादेशानुसार टाटा मोटर्सने अशा स्वयंचलित गिअरच्या बसेस तयार करण्यास सुरुवात केली असून राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत या बस लवकर म्हणजे महिनाअखेरीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या शहरांतील स्थानिक परिवहन उपक्रमांना महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार एनएमएमटीच्या ताफ्यात ऑगस्टपर्यंत १० बसेसे येणे अपेक्षित होते मात्र सप्टेंबर संपत आला, तरी या बस आलेल्या नाहीत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या बसगाडय़ा महिला चालक व वाहक चालवणार आहेत. नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाने ही अट पूर्ण केलेली आहे पण महिला चालकांना या बस चालविणे सोयीचे व्हावे यासाठी त्या स्वंयचलित गिअरच्या असाव्यात अशी मागणी एनएमटीने केली होती. त्यासाठी एनएमएमटी प्रशासनाने सात महिन्यांपूर्वी १० स्वयंचलित गिअरच्या बसगाडय़ांची एक निविदा काढली होती. देशात अशा प्रकारच्या बस कमी किमती उपलब्ध नसल्याने या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिकेने टाटा मोटर्सला अशा प्रकारच्या स्वयंचलित गिअरच्या बस बनविण्याची विनंती केली आहे. राज्य परिवहन विभागाने यासाठी एनएमएमटीला अडीच कोटी रुपये अनुदान दिले असून अशा स्वंयचलित बसची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे.

या गाडय़ा महिनाअखरे दाखल होतील असा दावा एनएमएमटी प्रशासनाने केला आहे. पुढील महिन्यात नवी मुंबई व मुंबईतील मार्गावर महिलांनी महिलांसाठी एनएमएमटीच्या १० तेजस्विनी बस धावताना दिसणार आहेत.

नवीन बसगाडय़ांसाठी ३० कोटी रुपये

पालिका प्रशासनाच्या अनुदानावर उपक्रमाने नुकत्याच ३० नवीन बस घेतलेल्या आहेत. जुन्या गाडय़ांतील काही गाडय़ा कालबाह्य़ झाल्याने त्या सेवेतून बाद करण्याशिवाय पर्याय नाही. यात सीएनजीवर चालणाऱ्या १५० बसपैकी काही बस लवकर खराब झाल्याने त्या बाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दर वर्षी यातील २० बस बाद केल्या जात आहेत. त्यामुळे सेवेतील गाडय़ांची संख्या कमी होत आहे. ती वाढविण्यासाठी पालिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा पालिकेने नवीन बससाठी ३० कोटी रुपये उपक्रमाला दिले आहेत.

राज्य शासनाच्या अनुदानातून नवी मुंबईसाठी दहा तेजस्विनी बस मिळणार आहेत. प्रस्ताव मंजूर झाला असून महिनाअखेरीस या बसगाडय़ा सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. महिला चालकांसाठी स्वयंचलित गिअर असलेल्या बसगाडय़ा असाव्यात हा पालिकेचा आग्रह आहे. या कार्यादेशाप्रमाणे टाटाकडून बस बनवून घेतल्या जात आहेत. त्यामुळे विलंब झाला आहे.

– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:33 am

Web Title: tejaswini buses arrive soon
Next Stories
1 भुयारी मार्गासाठी पामबीचवर वाहतूक बदल
2 जेएनपीटी बंदरात लवकरच ‘सेझ’
3  घनकचऱ्याचा तिढा सुटला
Just Now!
X