23 November 2017

News Flash

टेम्पो चालकाची कळंबोलीत हत्या

रोडपाली परिसरात पुन्हा अशाच वादातून एका टेम्पो चालकाची हत्या झाली आहे.

प्रतिनिधी, पनवेल | Updated: September 12, 2017 3:03 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

मागील आठवडय़ात कळंबोलीमध्ये किरकोळ कारणावरून एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना रोडपाली परिसरात पुन्हा अशाच वादातून एका टेम्पो चालकाची हत्या झाली आहे. या घटनेत संशयित म्हणून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

रोडपाली येथील अवजड वाहने उभी करून तेथेच चालक मद्यपान करतात. त्यामुळे अशा मद्यधुंद अवस्थेत आपसात होणाऱ्या वादांचे पर्यवसन हत्येसारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्येदेखील होत आहेत. पुणे जिल्ह्य़ातील सासवड येथील बाळू पुरुषोत्तम थोरात याचीदेखील अशाच किरकोळ वादातून हत्या झाली आहे. बाळू यांच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करण्यात आला असून नंतर त्याचा गळा दाबल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संतोष विनोदकुमार तिवारी (२४) व हदयप्रसाद मिन्टूराम (३२) या दोघांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

रोडपाली येथील अवैध पार्किंग नागरिकांची डोकेदुखी

रोडपाली परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना बंदी असावी यासाठी अनेक वेळा प्रशासनांकडे लेखी पत्रव्यवहार केला असला तरी येथील बेकायदा पार्किंग बंद झालेले नाही. सेक्टर १४ ते २० या परिसरातील रहिवाशी या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे हैराण आहेत. सिडको प्रशासनाच्या मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्यालगत घातक रसायनांनी भरलेली अवजड वाहने येथे उभी असतात. चालक रस्त्यालगतच आपला प्रात:र्विधी आटोपतात. तेथेच मद्यप्राशन व चालकांचे तंटे पाहायला मिळतात. पोलीस दिखाव्यापुरती तात्पुरती कारवाई करतात. मात्र येथे कायमस्वरूपी तोडगा प्रशासन काढू शकलेली नाही. त्यामुळे कोटय़वधींच्या सदनिका खरेदी करून येथील रहिवाशांना खिडकीबाहेर चालकांचे उघडय़ावरील आंघोळ व प्रात:र्विधी पाहण्याची वेळ येते. तसेच मद्यधुंद चालकांमुळे रस्त्यांवरून चालणाऱ्या महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.

कळंबोली येथील चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दुकलीला आज पनवेल येथील न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या हत्येचा उलगडा रविवारी पहाटे पोलिसांनी केला. या वेळी मारेकरी घटनेनंतर स्वत:चे अवजड वाहन घेऊन तळोजा येथे पसार झाले होते. मात्र दहा तासांत या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

– कोंडीराम पोपेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

First Published on September 12, 2017 3:03 am

Web Title: tempo driver killed in kalamboli