खड्डय़ांची तात्पुरती दुरुस्ती

नवी मुंबई तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात का होईना काही प्रमाणात बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूककोंडी कमी झाली आहे.

गेले दोन आठवडे पडलेल्या संततधार पावसाने शीव-पनवेल महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. अनेक ठिकाणी  खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी आणि अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठली आहे. राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागावर नवी मुंबई पालिकेकडे मदत मागण्याची वेळ आली आहे.

मात्र तीन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. ही दुरुस्ती कायमस्वरूपी नाही. गणेशोत्सवानंतर खाऱ्या अर्थाने रस्ते दुरुस्ती होणार आहे. सध्या खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक, राडारोडा, सिमेंट, खडी-वाळू-हॉट मिक्स्चिर टाकण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी वाहनांनी अद्याप पूर्वीप्रमाणे वेग घेतलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवाण्यास सुरुवात केली आहे. अपघात होऊ  शकतील असे खड्डे निदर्शनास आणले आहेत. ते बुजवल्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी झाली आहे.

– किसन गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे विभाग

पावसाने उघडीप देताच कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. शीव-पनवेल मार्गावर अपघाताला कारणीभूत ठरू शकतील असे खड्डे बुजवण्यास प्राधान्य दिले जात आहे.

– के. टी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग