18 October 2018

News Flash

दीड हजार वाहनांच्या तपासणीनंतर आरोपींचा माग

जुईनगर बँकफोडी प्रकरण

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जुईनगर बँकफोडी प्रकरण

जुईनगरमधील बँक ऑफ बडोदावरील दरोडय़ातील आरोपींच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांनी एका रात्रीत दीड हजार वाहनांची तपासणी केली. भुयाराच्या ठिकाणी सापडलेले गुटख्याचे पाकीट आणि हिंदी वर्तमानपत्र पोलिसांच्या तपासाला दिशा देणारे ठरले.

जुईनगर सेक्टर ११ येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेजवळील आठवा गाळा भाडय़ाने घेऊन या दरोडय़ाचा कट रचण्यात आला. हा गाळा भाडय़ाने घेणारा आरोपी गेना प्रसाद याचा काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाजीद अली मिर्झा बेग उर्फ अज्जू याने उत्तर प्रदेशातून चार मजूर आणले होते. पाच महिने गाळ्यापासून बँकेच्या लॉकर रुमपर्यत २५ फूट लांबीचे भुयार त्यांनीच खोदले. हे काम अतिशय सावधतेने केले जात होते. खोदकाम करताना बाहेर आवाज येतो का, हे पाहण्यासाठी काही जणांना तैनात करण्यात आले होते. १२ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत बँकेचे ३० लॉकर फोडून कोटय़वधींचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले.

भुयार खोदून बँक लुटण्याच्या राज्यातील या पहिल्या गुन्ह्यने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. नवी मुंबई पोलिसांनी दहा पथके तयार केली. पोलीस महासंचालक सतीश माथूर तपासाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून होते. घटनास्थळी मिळालेली गुटख्याची पाकिटे आणि एक हिंदी वर्तमानपत्र यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. सोसायटीच्या सीसीटिव्ही कॅमेरात एका मारुती इर्टिका गाडीच्या सातत्याने हालचाली दिसून येत होत्या. पोलिसांनी हीच गाडी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गाडीच्या क्रमांकावरून मालक शोधून काढण्यात आला. पण गाडीवरील क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यतील पहिले चार आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत घाटकोपर येथील पार्क साईट आणि आजूबाजूच्या परिसरातील दीड हजार गाडय़ांची तपासणी केली. त्यावेळी गुन्ह्य़ात संशयास्पद असणारी गाडी पोलिसांना सापडली. पण, त्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ टेहळणी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले होते. त्यामुळे पोलिसांनी साडेदहापर्यंत या गाडीवर लक्ष ठेवले. तीन आरोपी गोव्याकडे जाण्यासाठी या गाडीत बसले. पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येईपर्यंत या गाडीची वाट पहिली. याच वेळी शिवाजीनगरमध्ये चौथा आरोपी या गाडीत बसला. वाशी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी गाडीचा वेग कमी केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी या गाडीला घेराव घातला. आरोपींनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. या सर्व आरोपींवर ३० ते ४० गुन्हे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार अज्जू याचे मुंबई सेंट्रल भागात पाच प्लॅट आहेत. पोलीस त्याची मालमत्ता सील करणार आहेत.

मद्यपान केल्यानंतर आरोपी घडाघडा बोलला

या प्रकरणातील एका आरोपीने मद्यपान करू देण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी ती मान्य केली. मद्यपानानंतर हा आरोपी घडाघडा बोलू लागला. त्याने या दरोडय़ाची सर्व माहिती पोलिसांना सांगितली.

 

First Published on December 7, 2017 2:03 am

Web Title: ten arrested in navi mumbai bank robbery