शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईतून मूळ गावी जाणाऱ्यांचा आकडा दहा हजार, तर इतर क्षेत्रातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य म्हणजे ४३ इतकी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शहरातून बाहेर जाणाऱ्यांच्या अर्जावरून ही माहिती उघड झाली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात परराज्यांतील आणि राज्यांतर्गत नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात आजवर परराज्यात दहा हजारांहून अधिक लोकांनी प्रयाण केले आहे. याच वेळी नवी मुंबईत फक्त ४३ रहिवासी आजवर परतले आहेत. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात आंतरराज्य स्थलांतरितांचा नवी मुंबईतील आकडा सुमारे पाच हजार इतका आहे. दहावी-बारावी परीक्षांचा काळ संपता संपता नवी मुंबईत करोना विषाणूचे संक्रमण सुरू झाले. सुरुवातीच्या काळात शहरात टाळेबंदी लागू जाईल, या शक्यतेने अनेकांनी त्यांच्या मूळ गावी जाणे पसंत केले. यात अनेक छोटे व्यावसायिक, मजूर तसेच सिनेसृष्टीत काम करणारे अनेक तंत्रज्ञ, नोकरदारांचा समवेश होता. मात्र, प्रत्यक्ष टाळेबंदी लागू झाल्यानंतर गावी गेलेले गावीच, तर कामानिनित्त नवी मुंबईत आलेले शहरात अडकले. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना मूळ गावी जाणे शक्य झाले नाही. राज्य परिवहन मंडळाच्या गाडय़ा आणि खासगी बसमधून काहींनी गावे गाठल्याचे पोलीस उपायुक्त मेंगडे यांनी सांगितले.