प्रतिजन किंवा आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने गोळा न केलेल्या नागरिकांचेही करोना निदान अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबई महापालिकेत उघडकीस आला आहे. त्यात काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावेही अहवाल तयार करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे चार ते पाच हजार नागरिकांच्या नावांचे बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. ‘डेटा एन्ट्री’तील गफलतीने हा गोंधळ झाल्याचे पालिकेतील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे करोना चाचण्यांबाबत साशंकता निर्माण झाली असून यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला जात आहे.

हा सर्व प्रकार प्रतिजन चाचण्यांतून बाधित आढळणाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत घडल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘आरटीपीसीआर’ चाचणीत बाधित आढळणाऱ्यांची नोंद महापालिकेच्या नेरुळ येथील प्रयोगशाळेतील ‘डेटा एन्ट्री’ विभागात केली जाते. तर प्रतिजन चाचण्यांच्या ‘डेटा एन्ट्री’साठी हंगामी तत्त्वावर २५ संगणक चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. या चालकांकडूनच हा गैरप्रकार घडल्याची चर्चा आहे.

बाधितांची संख्या योग्य

चाचणी न करताच ‘निगेटिव्ह’ अहवाल देण्यात आल्याने खळबळ उडाली असली तरी ‘पॉझिटिव्ह’ अहवालात घोळ नसल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय घडले काय?

चाचणी न करताच नागरिकांचे करोना अहवाल तयार करण्यात आले. इतकेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या नागरिकांचेही चाचणी अहवाल तयार केले गेले आहेत. करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे मोठय़ा प्रमाणात चाचण्या सुरू आहेत. रुग्णांची संपर्कशोध मोहीमही तीव्र करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत प्रतिजन आणि आरटीपीसीआर अशा एकूण तीन लाख ४८ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता हा प्रकार उजेडात आल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेबद्दल संशय निर्माण होत आहे.

जबाबदार कोण?

*  करोना चाचणी करण्यात येणाऱ्या आणि निदान झालेल्या व्यक्तींची नावे आणि पत्त्यांच्या नोंदी करणाऱ्या ‘डेटा एन्ट्री’ प्रक्रियेदरम्यान हा गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

*  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत केलेल्या पाहणीत करोनाबाधित आढळल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेऊन त्यांची संगणकात नोंद केली जाते. या प्रक्रियेदरम्यानच संगणक चालकाने या नावांपुढे ‘करोना निगेटिव्ह’ अशी नोंद केल्याचे दिसत आहे.

हयात नसलेल्यांच्या चाचण्यांचे अहवाल ‘नकारात्मक’ देण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याबाबत सखोल आणि नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल आणि या प्रकाराचा छडा लावला जाईल.

– अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका