News Flash

ठाणे-बेलापूर प्रवास वेगवान

ठाणे-बेलापूर हा मार्ग ठाणे आणि नवी मुंबईसह आसपासच्या शहरांतील वाहतुकीसाठीही महत्त्वाचा मानला जातो.

महापे येथील भुयारी मार्ग आणि घणसोली-तळवली येथील व सविता केमिकल्स कंपनीनजीकच्या उड्डाणपुलांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या मार्गामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

दोन उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या आणि प्रामुख्याने ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढवणाऱ्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उद्घाटन केले. तळवली-घणसोली उड्डाणपूल, सविता केमिकल  कंपनीजवळील उड्डाणपुलासह महापे येथे उभारण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर या मार्गावरील तुर्भे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पादचारी पूल वा भुयारी मार्ग उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.  यामुळे या मार्गावरील प्रवास निर्विघ्न होणार आहे.

ठाणे-बेलापूर हा मार्ग ठाणे आणि नवी मुंबईसह आसपासच्या शहरांतील वाहतुकीसाठीही महत्त्वाचा मानला जातो. मुंबईच्या पश्चिम उपनगरांतून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनेही या मार्गाचाच वापर करतात. तसेच ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील कारखान्यांमुळे या रस्त्याला औद्योगिकदृष्टय़ाही विशेष महत्त्व आहे. या मार्गावरील वाहतुकीचा भार गेल्या काही वर्षांत वाढल्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तळवली ते घणसोलीदरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नवी मुंबईहून कल्याण, डोंबिवली, शीळकडे जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी लक्षात घेऊन महापे येथे भुयारी मार्ग तयार करण्याचेही ठरवण्यात आले.  हे पूल तयार असूनही उद्घाटन न झाल्याने वाहतूक सुरू झाली नव्हती. अखेर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मार्ग वाहतुकीस मोकळा केला. घणसोली-तळवली उड्डाणपुलामुळे ठाणे ते तुर्भे हे अंतर १०-१५ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र, तुर्भे येथे रस्त्यालगत असलेली झोपडपट्टी व येथील वर्दळ यांमुळे या वाहतुकीचा वेग त्याठिकाणी मंदावण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर तुर्भे येथे लवकरच स्कायवॉक अथवा भुयारी मार्ग बांधण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कार्यक्रमात दिली.  तसे झाल्यास ठाणे-पनवेल किमान एक ते सव्वा तासांचे अंतर अवघ्या ३०-४० मिनिटांत पार करता येईल.

दीड लाख कोटींची कामे

  • सध्या नवी मुंबई व ठाणे परिसरांत दीड लाख कोटींची कामे सुरू असून ती वेळेवर पूर्ण करण्यात येतील. २५८ किलोमीटरपैकी १६० किलोमीटरची कामे सुरू करण्यात आली आहेत. मुंबई आणि उपनगरांत कुठूनही कुठेही जास्तीत जास्त एका तासात पोहोचता यावे हे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • ‘‘एमएमआरडीएकडील पैसा केवळ फिक्स डिपॉझिट ठेवून व्याज घेण्यासाठी नाही, तर लोककल्याणकारी प्रकल्प राबवण्यासाठी आहे. एमएमआरडीएने आता केवळ मुंबईतच नव्हे तर अन्यत्रही मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली आहेत. नवी मुंबईत जेएनपीटी, औद्योगिक वसाहत तसेच नाशिक भागातून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे जी वाहतूक कोंडी होत होती ती सुरळीत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत. भविष्यातही मोठे प्रकल्प येणार आहेत,’’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
  • नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यात आला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

कंटेनरसाठी रोरो सेवा?

जेएनपीटीहून गुजरातला ये-जा करणाऱ्या कंटेनरची वाहतूक मोठय़ा प्रमाणात नवी मुंबई, ठाणे, घोडबंदरहून केली जाते. त्यावर उपाय म्हणून रोरो सेवेद्वारे कंटेनर वाहतूक होऊ  शकते का याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

श्रेयासाठी राजकीय फलकबाजी

रबाळे ते घणसोली या दीड किलोमीटर आणि पावणे येथील अर्धा किलोमीटर अंतराचे उड्डाणपूल कोणाच्या काळात मंजूर झाले, यावरून सध्या नवी मुंबईत श्रेयवादाचे ढोल वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकार्पण सोहळ्यात फलकबाजी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:41 am

Web Title: thane belapur new road way
Next Stories
1 वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे आश्वासन
2 मुख्यमंत्री-जयस्वाल सौहार्दाने पक्षाचीच कोंडी?
3 ठाण्यातील क्रीडा संकुले राजकीय नेत्यांना आंदण
Just Now!
X