मुंब्रा बायपास मार्गावरील अवजड वाहतूक वळवल्याचा परिणाम

मुंब्रा बायपास मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गावर वळविल्याने बुधवारी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐरोली टोल नाका ते महापे उड्डाणपुलापर्यंत ही कोंडी पसरली होती. पुढील आठवडय़ात मुंब्रा मार्गावरील वाहतूक पूर्ण वेळ याच मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे किती वाहतूक कोंडी होऊ शकते, याची झलक बुधवारी दिसली. ठाणे-बेलापूर मार्ग हा जड वाहनांच्या वाहतुकीसाठी अरुंद असल्याने तिथे वाहतूक कोंडीचा परिणाम तात्काळ जाणवत आहे. रबाळे-घणसोली उड्डाणपूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या मुंब्रा बायपासची दुरुस्ती सध्या सुरू आहे. ही दुरुस्ती लवकर व्हावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती जोरात सुरू झाली आहे. या मार्गावरून होणारी जड वाहतूक एक दिवसाआड ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली टोल नाकामार्गे वळवली जात आहे. बुधवारी अशी वाहतूक वळवल्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास मोठी कोंडी झाली. ही कोंडी तीन तास कायम राहिली.

तिचा परिणाम शहरी भागातील अंर्तगत रस्त्यांवरही झाला. ऐरोली, घणसोली, रबाळे येथील अंर्तगत मार्गावर सर्व वाहने आल्याने कोंडीत अधिक भर पडली. त्याचप्रमाणे एमआयडीसीतील रिलायन्समागील रस्त्यावरही वाहनांची कोंडी झाली. ती पुढे तळवली, रबाळे, घणसोली ते महापे या मार्गावर पोहोचली.

१६ एप्रिलपासून मुंब्रा बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत. ठाणे-बेलापूर महार्माग हा चार मार्गिकांचा असल्याने जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वळणावर त्रास होतो. त्यामुळे कोंडीत भर पडते. ठाणे व नवी मुंबईतील वाहतूक अधिकाऱ्यांनी या संभाव्य कोंडीची पाहणी केली आहे. त्यामुळे मुंब्रा मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीला पुढे वाशी खाडी पूल हा एक चांगला पर्याय ठरू शकेल असे सुचविण्यात आले आहे. शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण होऊन तो १० मार्गिकांचा झाला आहे. वाशी खाडी पुलाची दुरस्ती सुरू असतानाही वाहतूक अशा प्रकारे वळविण्यात आली होती.

मुंब्रा बायपासचे काम सध्या सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली होती. हा मार्ग मोठय़ा व अवजड वाहनांच्या तुलनेत अरुंद आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला.

योगेश माने, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नवी मुंबई</strong>