सीमा भोईर

पुरुष चालकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप

महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अबोली रिक्षा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी सध्या पनवेलमधील अबोली रिक्षाचालकांना काळ्या-पिवळ्या रिक्षाचालकांच्या मुजोरीचा सामना कारावा लागत आहे. फक्त महिला प्रवासीच घ्या, शेअर भाडे घेता येणार नाही, स्टॅण्डवर रिक्षा लावायची नाही, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे अबोली चालकांचे म्हणणे आहे. मुद्दाम ओव्हरटेक करणे, अश्लील शेरेबाजी करणे हे नित्याचेच आहे, असे चालकांचे म्हणणे आहे.

पनवेलमध्ये ८ मार्चला तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे व तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते महिला रिक्षांचालकांसाठी असलेल्या थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. आरटीओने २२  महिलांना रिक्षा परवाने दिले. सुरुवातीला कुतूहलाचा विषय ठरलेल्या अबोली रिक्षाला पनवेलमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आणि काळ्या-पिवळ्या रिक्षांच्या गर्दीत अबोली रिक्षाही शहरातील रस्त्यांवरून सुसाट धावू लागली, मात्र पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आपली गळचेपी केली जात असल्याची व्यथा सध्या अबोली रिक्षाचालक व्यक्त करत आहेत.

डी मार्ट, आदई सर्कल, रेल्वे स्थानक, पनवेल एसटी स्थानकामागे, अबोलीसाठी स्वतंत्र थांबे तयार करण्यात आले आहेत. मात्र हे थांबे वगळता इतर कोणत्याही थांब्यावर रिक्षा लावण्यासाठी अबोली रिक्षाचालक गेल्यास त्यांची अडवणूक केली जाते. सोसायटी नाका व पनवेल शहरात इतर ठिकाणी बरेच शेअर रिक्षा तळ आहेत. तेथेही रिक्षा लावण्यात आडकाठी केली जाते, असे अबोली रिक्षाचालक सुनीता जाधव यांनी सांगितले.

रिक्षा चालवताना मुद्दाम जवळून रिक्षा नेऊन, कधी कधी ओव्हरटेक करून घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा रेल्वे स्थानक परिसरात पुरुष प्रवाशांना अबोलीत बसवण्यास अडवणूक केली जाते. अबोली महिलांसाठी आहे, फक्त महिला प्रवाशांनाच या रिक्षात बसवा, अशी दमदाटीही केली जाते, असे मनीषा देशमुख यांनी सांगितले.

अबोली रिक्षा पाहताच काही रिक्षाचालक अश्लील हावभाव करतात, शेरेबाजी करतात, पण कामाच्या वेळेत व्यत्यय नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे काही महिला चालकांनी सांगितले.

अबोलीला पनवेलमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे. मात्र रिक्षा चालवताना येत असलेले कटू अनुभव आणि समस्या दूर करणे आवश्यक आहे. आरटीओला अनेक वेळा विनंती अर्ज केले आहेत, मात्र अबोलीची मुस्कटदाबी सुरूच आहे. असेच सुरू राहिल्यास महिला वेगळं काम करण्यास पुढे येणार नाहीत.

– शालिनी गुरव, उपाध्यक्ष, अबोली रिक्षा युनियन

अबोली रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांचा नेहमी त्रास होतो. बहुतेक वेळा महिला याकडे दुर्लक्ष करतात. या रिक्षामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे, मात्र पुरुषी अहंकार वरचढ ठरत आहे. मुजोर रिक्षाचालकांना कायद्याच्या बडगा दाखवला जाईल.

– संतोष भगत, अध्यक्ष, संस्थापक, अबोली रिक्षा संघटना