नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील वृक्ष लागवडीचे काम ठेकेदारांकडेच

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करण्यास अनेक प्रायोजक उत्सुक असताना मर्जीतील कंत्राटदारांना वृक्ष लागवड आणि संगोपनाचे ठेके देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रायोजकांना हे काम दिल्यास वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी पालिकेला खर्च करावा लागणार नाहीच, शिवाय जाहिरातीद्वारे तिजोरीत भरही पडणार आहे. असे असताना हे काम कंत्राटदारांना का देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर उड्डाणपूल आणि बोगद्याचे काम करताना एमएमआरडीने झाडांची कत्तल केली होती. या झाडांची लागवड पुन्हा याच प्राधिकरणाने करणे अनिवार्य आहे. तरीही पालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुभाजकांवर झाडे लावण्याचे लाखो रुपये खर्चाचे काम परस्पर सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. अशा हमरस्त्यासाठी पालिकेकडे प्रायोजकांचे अनेक प्रस्ताव पडून आहेत. प्रायोजकांना हे काम दिले तर जाहिरातीद्वारे पालिकेच्या तिजोरीत भर पडेलच, शिवाय वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी कुठलाही खर्च करण्याची गरजही भासणार नाही, मात्र असे असूनही मर्जीतील कंत्राटदारांना लाखो रुपयांची कामे दिली गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ठाणे-बेलापूर रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने महापे उड्डाणपुलाखाली बोगदा बांधला. या कामात या परिसरातील अनेक झाडांची कत्तल करावी लागली. या मोबदल्यात एमएमआरडीएने नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि पालिकेने लाखो रुपये खर्च करून दुभाजकामध्ये रोपे लावण्याचे काम सुरू केले.

अशाच पद्धतीने कोपरखैरणे परिसरात नारळाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. पाच लाखांच्या आतील कामे असल्याने स्थायी समिती वा वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीची गरज नसल्याने हे शक्य होत आहे.

कमी मोक्याच्या असलेल्या जागा प्रायोजकांना देण्यात येत आहेत. याच रस्त्यावर प्रायोजक कंपनीला देण्यात आलेली जागा रबाळे पोलीस ठाणे आणि कोपरखैरणे परिसरात आहे. ठाणे-बेलापूर रस्त्याशी नगरसेवकांचा थेट संबंध येत नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने या रस्त्यावर बिनधास्त कामे उरकली जात असल्याची चर्चा आहे. या कामांसाठी शहरात २० ठेकेदार असताना मनमानी पद्धतीने अवघ्या तीन ठेकेदारांना आपसात स्पर्धा करायला लावून ही कामे दिली जात आहे.

हे काम प्रयोजकाला काही अटींवर जाहिराती लावण्याच्या मोबदल्यात तीन वर्षांसाठी दिले जाते. यासाठी मनपाला हे प्रायोजक रक्कम अदा करत असल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडते, तरीही प्रायोजक मिळत नसल्याची सबब अधिकारी देत आहेत. प्रयोजकांनी मागणी केल्यावर त्यांना कमी वर्दळीची ठिकाणे दिली जातात, असे प्रायोजकांचे म्हणणे आहे.

प्रायोजकांना सकारात्मक प्रतिसाद नेहमीच दिला जातो. ठाणे-बेलापूर रस्त्यावर प्रायोजाकाद्वारे वृक्ष लागवड आणि संगोपन केले जाणार आहे. हे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यात येईल.

– नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग