पुढील आठवडय़ात कार्यादेश; ७० कोटी खर्च

नवी मुंबई : गेली आठ वर्षे नवी मुंबईकरांना दाखविण्यात येत असलेले दुसऱ्या नाटय़गृहाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. यासाठीची नव्याने राबवलेली निविदा प्रक्रिया मंजूर झाली असून आठवडाभरात कार्यादेश देण्यात येणार आहेत. मात्र प्रस्तावित खर्चात आता दुपटीने वाढ झाली असून यासाठी ७० कोंटींचा खर्च होणार आहे.

या नाटय़ागृहाच्या घोषणेला आठ वर्षे लोटली आहेत. भूमिपूजन करून भूखंडावर खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. यात अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. आता हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

२०१४ मध्ये ऐरोली सेक्टर ५ येथील माऊली संकुलाजवळील भूखंडावर नाटय़गृहाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र गेली कित्येक वर्षे लोटूनही या ठिकाणी साधी पायाभरणीही झाली नव्हती नाटय़प्रेमी, नागरिक यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत होता. या भूखंडावर फक्त खोदकाम करून टेवल्याने मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकणी काही अपघातांसह आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तात्पुरती पत्र्याची भिंत बांधण्यात आली आहे. तसेच सभोवताली झाडी तयार झाली आहे. नाटय़गृहाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या आधीच्या महावीर कंपनी या ठेकेदाराने आर्थिक सबब पुढे करून काम रखडवले होते. त्यामुळे तो भूखंड अडगळीत पडला होता.

आता नाटय़प्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवली असून त्याला मंजूर देण्यात आली आहे. सुपर कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम देण्यात आले आहे. आठवडाभरात हे काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे दोन वर्षांत या नाटय़गृहात प्रयोग सुरू होतील अशी माहिती महापालिका परिमंडळ २ मुख्य अभियंता गिरीश गुमास्ते यांनी सांगितले.३० कोटींचा खर्च ७० कोटींवर

या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ५६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. व यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत ३० कोटींचा खर्च धरण्यात आला होता. मात्र या कामाची रखडपट्टी झाल्याने या खर्चात आता दुपटीने वाढ झाली आहे. आता नाटय़गृहासाठी ७० कोटींचा खर्च होणार आहे.

८६० आसन क्षमता

हे नाटय़गृह ८६०आसन क्षमतेचे असणार आहे. यामध्ये दुमजली पार्किंग तसेच बहुउद्देशीय सभागृह, सराव हॉल, कर्मचारी खोली, उपाहारगृह, शौचालय यासह पोषाक कक्ष आदी सुविधा असणार आहेत.