‘एपीएमसी’तून यंदा हापूसची ५० टक्केच निर्यात

नवी मुंबई : हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ‘एपीएमसी’त हापूसची आवक निम्म्यावर आली आहे. उत्पादन कमी, करोना महामारी, टाळेबंदी यामुळे हापूसच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. आतापर्यंत ५० टक्केच निर्यात झाली असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली.

आखाती देश, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकाणी देवगड, रत्नागिरी आणि अलिबाग येथील हापूस आंब्यांना मागणी असते. एपीएमसी बाजारात हापूसची आवक एप्रिलपासून मोठय़ा प्रमाणात होते. परंतु यंदा हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन झाले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात दरवर्षी होणारी आवकही कमी झाली. थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंब्याच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. हापूस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून हापूस निर्यात करावा लागतो. आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्त्वाचा असतो. यंदा अवकाळी पावसामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम झाला. त्यामुळे काही प्रमाणात काळवंडलेला निघत होता. त्यातच करोना साथ रोग आणि टाळेबंदी यामुळे निर्यात होणारी हवाई वाहतूक सेवाही मिळत नव्हती. दिवसाआड निर्यात करण्यात येत होती, अशी माहिती निर्यातदारांनी दिली.  मागील वर्षी २०२० मध्ये ४९ हजार ६५९ मेट्रिक टन निर्यात झाली होती तर यंदा मार्च महिन्यापर्यंत १७ हजार ६७० मेट्रिक टन निर्यात झाली. तर एप्रिल महिना व मे महिन्यातील काही दिवस मिळून ३० ते ३२ हजार मेट्रिक टन निर्यात करण्यात आली आहे. ही निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केच झाली आहे.

यंदा बाजारात कमी हापूस दाखल होत आहे. तसेच विविध कारणांनी उत्पादन तर घटले आहेच, परंतु फळाचा दर्जा देखील खालावला होता. तसेच टाळेबंदीमुळे निर्यातीसाठी हवाई वाहतुकीची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध होती. त्यामुळे आतापर्यंत ५० टक्केच हापूसची निर्यात झाली आहे.

-मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार

गेल्या चार वर्षांपासून आंबा उत्पादनावर परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आंबा उत्पादक संघ आंबा बागायतदारांना सेंद्रिय खते, औषध याबाबत जनजागृती करून उत्पादन कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

-चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र आंबा उत्पादक संघ