15 February 2019

News Flash

विमानतळ प्रकल्पग्रस्त गावांतील शाळांत अखेरचे झेंडावंदन

येथील गावांत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम हे दरवर्षी शाळेच्या पटांगणातच होत.

गावांतील अखेरच्या स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी, गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

सीमा भोईर, पनवेल

स्थलांतरित झालेले रहिवासी; नव्या शाळांत दाखल झालेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी मूळ गावांत एकत्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त गावांतील शाळांमध्ये बुधवारी भावपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या शाळांत साजरा केला जाणारा हा अखेरचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे स्थलांतरित झालेले रहिवासी शाळेच्या आवारात जमले होते. काही गावांतील शाळांचेही स्थलांतर झाले आहे, तरीही त्या शाळांचे विद्यार्थी गावातील जुन्याच शाळेत जमले आणि तिथेच ध्वजवंदन करण्यात आले.

येथील गावांत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम हे दरवर्षी शाळेच्या पटांगणातच होत. त्यासाठी सर्व गावकरी तिथे येऊन ध्वजवंदन करीत.

गावकऱ्यांच्या अनेक पिढय़ा ज्या गावात राहिल्या आणि ज्या शाळेच्या पटांगणात स्वातंत्र्य दिन साजरे केले गेले, त्या गावात पुढच्या स्वातंत्र्य दिनी येता येणार नसल्याने यंदा सर्व गावकरी एकत्र जमले होते. झेंडावंदन यापुढेही होत राहील, मात्र जागा ही नसेल, असे म्हणत काही ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

उलवे टेकडीची उंची कमी करण्याचे अर्धे काम झाले आहे. चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचा ओवळा, वाघिवली, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर व कोंबडभुजे वडघर या गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. कोपर, चिंचपाडा, वाघिवली, वाघिवली वाडा या गावांचे स्थलांतर झाले आहे. चिंचपाडा, वडघर-कोपर, वाघिवली वाडा या गावांची शाळा ही करंजाडे नोडमध्ये बांधण्यात आली आहे. त्यांचेही झेंडावंदन गावच्या शाळेतील पटांगणात झाले. सपाटीकरण झाल्यानंतर पुन्हा कधीही गावात येता येणार नाही, गावचे उरलेसुरले अवशेषही नामशेष होतील, या भावनेतून येथे ध्वजवंदन करण्यात आले.

विमानतळबाधित क्षेत्रात आमची गावे आहेत. आम्हाला सिडकोच्या माध्यमातून भूखंड मिळाले आहेत, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पुन्हा आम्ही असे एकत्र जमू न जमू याची शाश्वती नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी शेवटचे झेंडावंदन आपापल्या गावांत करण्याचा निर्णय घेतला.

– चंद्रकांत पाटील, ग्रामस्थ

First Published on August 16, 2018 2:33 am

Web Title: the last flag entry in the schools in the project affected villages