नवी मुंबईत विविध महोत्सव, स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबई पुण्यापेक्षा सांस्कृतिक चळवळीत मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढावी यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून बुधवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दुबई, मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे शहराची एक वेगळी ओळख निर्माण करणारा नवी मुंबई फेस्टिव्हल सुरू करण्याचा विचार पालिका स्तरावर करण्यात येत आहे.

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत सेवा, रोजगार आणि सांस्कृतिक चळवळ या निकषांवर पुण्याने नवी मुंबईला मागे टाकल्याने पालिका आता सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी पुढाकार घेत आहे. यात एकपात्री अभिनय स्पर्धा, नाटय़, संगीत स्पर्धा तसेच संपूर्ण देशातील नागरिक आकर्षित होतील असा नवी मुंबई महोत्सव सुरू करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी वाशी येथील भावे नाटय़गृहात आचार्य अत्रे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेची महाअंतिम फेरी होणार आहे. त्यासाठी मराठी नाटय़सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रसाद कांबळी, राजन भिसे, मधुरा वेलणकर-साटम, संदेश जाधव, ‘सिंघम’ फेम कमलेश सावंत, अशोक हांडे, आदिती सारंगधर, प्रेमानंद गज्वी, धनश्री क्षिरसागर आणि मौसमी तोंडवळकर हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ऐरोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने पालिकेने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

येत्या काळात महापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय नाटय़स्पर्धा, साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. संगीत नाटकांचे आयोजन करण्यात येणार आहे. साहित्य तसेच नाटय़ संमेलनाचे आयोजन करण्यासाठी पालिका प्रयत्नशील राहणार असल्याचे कळते. वाशीत दर वर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सवाला राजश्रय दिला जाणार आहे. नवी मुंबई पालिका गेली अनेक वर्षे भजनस्पर्धेचे आयोजन करत आहे.

संपूर्ण राज्यात अशा प्रकारे भजनसंध्या आयोजित करणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका आहे. या भागाला असलेला भजन-कीर्तनाचा वारसा लक्षात घेऊन पालिकेने गेली पंधरा वर्षे भजनस्पर्धा आयोजित केली आहे. संगीत, नाटय़, चित्रपट, साहित्य या सांस्कृतिक चळवळीबरोबरच नवी मुंबई फेस्टिवल भरविण्याचे पालिका नियोजन करीत आहे. त्यासाठी वाशीतील मध्यवर्ती ठिकाणाची निवड केली जाणार असून देश-विदेशातील कलाकारांची हजेरी लागेल असे नियोजन केले जात आहे.

महोत्सव काळात नवी मुंबईतील सर्व मॉल, सोन्या-चांदीची दुकाने, विविध बाजारपेठांत सवलतीच्या दरात वस्तू विकण्याचे आवाहन पालिका करणार आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल यांच्या पुढाकाराने आठ वर्षांपूर्वी अशा प्रकारचा महोत्सव दक्षिण नवी मुंबई भागात आयोजित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद लाभत असताना गिल यांच्यानंतर आलेल्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा महोत्सव गुंडाळला. त्यामुळे शहराच्या उत्तर क्षेत्रातील सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी आता पालिका सरसावली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर अनेक स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. नवी मुंबई महोत्सवाचेही नियोजन सुरू आहे.

– नितीन काळे, उपायुक्त, नमुंमपा