नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १६ हजारांच्या पार झाली आहे. शहरात आज ३८० नवे करोनाबधित आढळले असून बाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.

वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १६,१०७ झाली आहे. शहरात आज ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४३१ झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल १०,८५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ४,८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच शहरात आतापर्यंत १९,४८३ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ करोनाचाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला २ हजारांपेक्षा अधिक आहे. पालिका आयुक्त शहरातील विविध भागात पाहणी करून करोनाबाबतचा आढावा घेत आहेत. पालिका आयुक्त व कर्मचारी एकही दिवस सुट्टी न घेता सातत्याने कार्यरत असून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.