तीन निविदाकारांची माहिती न देण्यात आल्याने प्रस्ताव फेटाळला

नवी मुंबईतील वाहनतळांची समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या वतीने बेलापूर येथे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला होता, परंतु दोनदा हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

शुक्रवारी स्थायी समितीत  २७ कोटींचा वाहनतळाचा प्रस्ताव पुन्हा घेण्यात आला. या वेळी स्थायी सदस्यांनी इतर तीन निविदाकारांची माहिती का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

या वेळी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी आयुक्तांनी यात तीन निविदा का अपात्र केल्या? त्याची कारणे प्रशासनाने द्यावीत. तांत्रिकदृष्टय़ा तीन ठेकेदार बाद झाले आहेत. त्यांची माहिती द्यावी, अशी मागणी केली. याला वर्ष उलटूनही काम होत नाही, असे मत व्यक्त केले. रवींद्र इथापे यांनी बहुमजली वाहनतळ हा स्थायी समितीचा अधिकार आहे. या कामात संशय येत आहे. अपात्र ३ कंत्राटदारांना संधी दिलेली नाही. त्यांना संधी दिली असती तर पालिकेचे पैसे वाचले असते. या तीन ठेकेदारांची निविदा उघडावी आणि हा ठराव नामंजूर करून पुन्हा सादर करावा, असे मत व्यक्त केले

हा प्रस्ताव दहा कोटी रुपये खर्चाच्या अधिक आहे. त्यामुळे तो तांत्रिक समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्या समितीने निविदाकारांची छाननी केली आहे. त्यानुसार त्यांनी त्या कंपन्यांना अपात्र ठरविल्याची माहिती शहर अभियंता सुरेंद्र पाटील, यांनी दिली. तर तीन कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नावे देण्यात यावी. यात पालिकेचा जास्त पैसा खर्च होत आहे. त्यामुळे हा ठराव नामंजूर करण्यात आल्याचे स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी स्पष्ट केले.