पूनम धनावडे

द्राक्ष, अंजीर, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घटले, रोगाचा प्रादुर्भाव :- वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये सुरुवातीलाच द्राक्ष, अंजीर, स्ट्रॉबेरी फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या या फळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ५० टक्के उत्पादन घटले असून फळांचा हंगामदेखील महिनाभर लांबणीवर पडणार असल्याची माहिती घाऊकव्यापाऱ्यांनी दिली.

एपीएमसी बाजारात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष, अंजीर यांच्या २० ते २५ गाडय़ा दाखल होतात. मात्र यंदा अद्याप बाजारात एकही आवक झालेली नाही. परिपक्व झालेले फळ अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली, नाशिक, फलटण या भागांत द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. महापुरात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सांगली येथील शेतकऱ्यांनी २२ ऑगस्ट रोजी पुन्हा द्राक्षांच्या झाडांची छाटणी केली होती. मात्र पुन्हा दिवाळीपासून पावसाची संततधार, अतिवृष्टी झाल्याने या केलेल्या मशागतीवर पाणी फिरले आहे. द्राक्षे  रोगाचे बळी ठरले आहेत. द्राक्षांवर दावण्या, भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बागायतदारांचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. खर्च मात्र दुपटीने वाढला आहे.  एक एकरी द्राक्षांच्या बागायतीमध्ये साधारणत: चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना दोन लाख रुपयांच्या उत्पन्नाची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीवर पुन्हा खर्च करावा लागला. जिथे औषध फवारणीसाठी एक एकरी जमिनीसाठी ५० हजार रुपये खर्च येत होता तिथे तो एक लाख रुपये झाला आहे.  संपूर्ण उत्पादनासाठी एक लाख खर्च येत होता तिथे दोन लाख रुपयांची भर पडली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच मात्र उत्पन्न देखील निम्म्याने घटल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

महापुरात झालेल्या नुकसानीनंतर पुन्हा द्राक्षांच्या बागांची छाटणी करून पूर्ववत करण्यात आले होते.  आता पक्व द्राक्ष तयार झाली होती. मात्र दिवाळीपासून पडलेल्या अतिवृष्टीने पुन्हा उत्पादन घटले. द्राक्ष बागांवरील शेतकऱ्याचा खर्च  दुपटीने वाढला आहे. – नंदकुमार भीमराव पवार, शेतकरी, सांगली.