रात्री-बेरात्री तरुण-तरुणींचा धुडगूस, अनैतिक प्रकारांविरोधात पोलीस आयुक्तांना पत्र

बेलापूरजवळील पारसिक हिल येथील महापौरांच्या शासकीय निवासस्थानाभोवती सध्या अनैतिक धंदे आणि तरुण-तरुणींच्या स्वैर वागण्याचा विळखा पडला आहे. पारसिक हिल वाचवा, असे आवाहन करणारे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि महापौर जयवंत सुतार यांना देण्यात आले आहे.

महापौर निवासस्थानाचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. येथील शांतता पांथस्थाला प्रसन्न करणारी आहे. मात्र काही महिन्यांपासून या परिसरात शांतताभंग करणारी कारनामे केले असल्याचे पारसिक हिल रेसिडेन्स असोसिएशनने म्हटले आहे.

पोलिसांना दिलेल्या असोसिएशनच्या पत्रात अनैतिक प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी महापौर बंगल्याशेजारील गल्लीतून एका किशोरवयीन मुलीला काही जणांनी जबरदस्तीने काळ्या काचा असलेल्या गाडीत घालून नेल्याचे घटना घडल्याचे पत्रात म्हटले आहे. या घटनेचा दिवस आणि वेळही त्या पत्रात नोंदविण्यात आली आहे.

रात्रीच्या पारसिक हिलवर अनैतिक प्रकार सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अमली पदार्थाचा समावेश असलेल्या काही मेजवान्याही येथे झडत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. येथील काही व्यावसायिक अशा कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप असोसिएशनचे सचिव राजेंद्र लोखंडे यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे पारसिक हिलच्या दोन्ही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तसेच रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

महापौरांचे निवासस्थान असलेला पारसिक हिल व त्याचा सर्व परिसर अशांत होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनैतिक धंदे मोठय़ा प्रमाणात सुरू असून आमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे याबाबत पोलीस आयुक्त व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. – जयंत ठाकूर, अध्यक्ष पारसिक हिल रेसिडेन्ट असोसिएशन