सीमा भोईर

पनवेलमधील जिल्हा परिषद, पालिका शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिका

बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी शाळेत नेहमीप्रमाणे मुलं मराठी, इंग्रजी आणि गणिताच्या तासाला शांतच बसून ऐकत होती. पण फळ्यासमोरील ‘शिक्षकांना’ जरा जास्तच प्रश्न विचारायची स्पर्धाही सर्वामध्ये लागलेली होती. काहींनी तर ‘गुरुजींना’ प्रश्न विचारून त्या प्रश्नाचे उत्तरही तिथल्या तिथे देऊन टाकले आणि वर्गात एकच कल्ला उडाला. त्यामुळे नव्या शिक्षकांना त्यांना आवरताना थोडी अधिकच कसरत करावी लागली. आज वर्गावर आलेले ‘शिक्षक’ शाळेतलेच होते, पण नेहमीचे नव्हते. त्यामुळे बाकांवर बसलेली मुले-मुलेही जरा नेहमीपेक्षा अधिक सैलावलेली होती. रोजची वर्गातली शिस्त बाजूला सारून साऱ्याच विषयांचे ‘तास’ खेळीमेळीत झाले. हातात हात घालून हसतखेळतच मुलं शाळा सुटल्यावर घरी परतली. निमित्त होते आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे.

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांना आज ‘सुट्टी’ असल्याने विद्यार्थीच शिक्षक बनून अनेक शाळांममध्ये वर्गावर आले होते. सारे विद्यार्थी दिवसभर एका वेगळ्याच आनंदात बुडालेले होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

पनवेल तालुक्यातील एकूण २६४ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २४, ७१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या साऱ्या शाळा संपूर्णपणे ज्ञानरचनावादी झाल्या आहेत. यातील ११ शाळा या महापालिकेत समाविष्ट आहेत. काही शाळांमध्ये शिक्षक दिनाची आठवडाभर आधी तयारी विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली होती. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवायचं, अशी ही कल्पना. त्याचा विद्यार्थ्यांनीही कसून सराव केला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे विषय वाटून देण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्यार्थी शिक्षकांच्या वेषात बुधवारी ‘शिक्षक’ बनून आले होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. काही वर्गामध्ये फळ्यावर मोठय़ा अक्षरात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. काही शाळात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी वर्गावर योग्य रीतीने तास घेतला जात आहे का, यासाठीचे व्यवस्थापन करण्यात आले होते.