घणसोली येथील एनएमएमटी आगाराच्या उद्घाटनावरून सुरूझालेला नवीन आयुक्त तुकाराम मुंडे आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील क्षणिक वाद आता शाश्वत रूप धारण करणार आहे असे चित्र दिसून येत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक पूर्व सर्वसाधारण सभा घेऊन विविध विषयांची व्यहूरचना करीत असतात. यात कोणता प्रस्ताव मंजूर करायचा की नामंजूर त्याबाबत निर्णय घेतला जातो. यात आयुक्तांच्या प्रस्तावांवर देखील चर्चा केली जाते. नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना खो घालण्याचे काम नवीन आयुक्त करणार असून आक्रमक असलेले विरोधक अधिक आक्रमक होणार आहेत मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे अधिक लाड न करण्याचे तंत्र नवीन आयुक्तांचे असल्याने सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांबरोबरच विरोधी नगरसेवकांच्या नाराजीत भर पडणार आहे.
सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या बरोबर पंगा घेऊन सत्ताधारी पक्षातील नेत्यांची लुडबुड खपवून न घेणारे आयुक्त मुंडे यांनी नवी मुंबईतील विरोधक व पालिकेतील सत्ताधारी यांना अंगावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पालिका कारभाराचा अनुभव नसणाऱ्या आयुक्तांना सर्वसाधारण सभेत खिंडीत पकडण्याची रचना सत्ताधारी पक्षाकडून केली जाणार आहे. सत्ताधारी व काही विरोधकांनी सर्वसाधारण सभेत आयुक्तांच्या नावाने भविष्यात शिमगा केल्यास या सभांना हजेरी न लावण्याचा निर्णयही आयुक्त घेऊ शकणार आहेत. प्रभाग समित्यांची रचना न झाल्याने अगोदरच नगरसेवक व प्रभाग निधीची कामे प्रशासन काढत नसल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी सुचवलेल्या अनावश्यक कामांनाही आयुक्त केराची टोपली दाखविणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठकीत अतिरिक्त दिले जाणाऱ्या दरवाढीला (एक्सलेशन) वर आयुक्तांनी आक्षेप घेतला असून यानंतरची सर्व नागरी कामे छाननी होऊनच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या अगोदर नागरी कामांचा बार उडवून देणाऱ्या नगरसेवक यामुळे आत्ताच चिंताग्रस्त झाले आहेत. लोकांची कामे झाली नाहीत तर मतदारांना तोंड काय दाखविणार असा प्रचार गेली अनेक महिने नगरसेवक करीत होते. माजी आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही ही कामे न केल्याने नगरसेवक अधिक अडचणीत आले आहेत.

नाईकांच्या नगरसेवकांना कानपिचक्या
नगरसेवक व प्रभाग निधीतून अनावश्यक कामांचा रतीब घालणाऱ्या नगरसेवकांना सर्वच बाजूने चाप बसला असल्याने राष्ट्रवादीतील काही नगरसेवक शिवसेना भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यांना बिनधास्त पक्षांतर करण्याचा सल्ला नाईक यांनी एका बैठकीत दिला असून रात्री होणाऱ्या ओल्या पाटर्य़ातील चर्चेची आपल्याला माहिती असल्याचे नाईक यांनी सांगितले. पालिकेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नसल्याने काँस व अपक्षांची मदत घेतली गेली आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास पक्ष अडचणीत येणार असल्याने ज्यांना जायचे आहे. त्यांनी आत्ताच खुशाल जावे असे नाईक यांनी सांगितले आहे.