पुढील आठवडय़ात बेलापूर, नेरुळ रुग्णालये पूर्ण क्षमतेने

बेलापूर व नेरुळ येथील रुग्णालयीन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होत नसल्याने वाशी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढला होता. जमिनीवर गाद्या टाकून उपचार घेण्याची वेळ येत होती. आता नेरुळ येथील रुग्णालयात नवजात पालिकांचा अतिदक्षता विभाग सुरू झाला असून बेलापूर रुग्णालय या आठवडय़ापासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. त्यामुळे हा रुग्णसेवेचा ताण कमी होणार आहे.

महापालिकेने शहरात बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे रुग्णालयांसाठी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. परंतू या सर्वच नव्याने उभारलेल्या इमारतीत तोकडी आरोग्यसेवा दिली जात आहे. बेलापूर येथील ५० खाटांच्या माता बाल रुग्णालयाचे उद्घाटन १२ ऑगस्ट २०१४ रोजी झाले, परंतु आजतागायत या ठिकाणी फक्त बाह्य़रुग्ण सेवा विभागच सुरू होता. तर डॉक्टरांअभावी नेरुळ रुग्णालयातील सेवा नेहमीच ठप्प होत होत्या. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या वाशी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी नेहमीच होत होती. त्यामुळे आरोग्यसेवा मिळत नसल्याने तीव्र नाराजी रुग्णांमध्ये होती.

आता नेरुळ व बेलापूर येथील माताबाल रुग्णालयांच्या आरोग्य सेवेकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत आहे. नेरुळ येथे नुकतेच नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाशी रुग्णालयात यासाठी येणाऱ्या नवजात बालकांचे प्रमाण कमी होणार आहे.

बेलापूर येथील रुग्णालय आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी आठ डॉक्टरांचीही नेमणूक झाली आहे. या रुग्णालयाच्या इमारतीतील बराचसा भाग वापराविनाच खराब झाला आहे. या ठिकाणच्या स्टाइल्स निघाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीची कामे अभियंता विभागाकडून सुरू आहे. उपकरणे व इतर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणीही नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. येथील कर्मचाऱ्यांना वाशी येथे काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या इमारतीला र्निजतुकीकरण करण्यात आल्यानंतर लगेचच येथे माता बाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांनी दिली. या रुग्णालयात प्रसूती उपचार सुरू करण्यासाठी लागणारी नवीन उपकरणे, खाटा दाखल झाल्या असून सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.

बेलापूर येथील माता बाल रुग्णालय पुढील आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मी स्वत: या कामावर बारकाईने लक्ष देत आहे. फक्त अभियंता विभागाचे काम पूर्ण करून र्निजतुकीकरण करताच रुग्णालय सुरू करणार आहे. त्याचबरोबर ऐरोली येथेही नवजात बालक अतिदक्षता विभाग सुरू करणार आहे. नेरुळ येथील रुग्णालयाची पाहणी करून सार्वजनिक रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका