|| पूनम धनावडे

नाटय़प्रेमींकडून संताप; आणखी दोन वर्षे लागणार

नवी मुंबईतील नाटय़रसिकांना अजून एक ‘रंगमंच’ उपलब्ध व्हावा या उद्देशाने ऐरोली येथे दुसरे नाटय़गृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला, मात्र नाटय़गृहाच्या उभारणीचा अद्याप श्रीगणेशा झालेला नाही. अवघे भूमिपूजन करून डबके तयार करून ठेवल्याने नाटय़प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

वाशीमध्ये विष्णुदास भावे नाटय़गृह आहे. नवी मुंबईचा वाढता विस्तार पाहता व मुंबईसह इतर नाटय़कर्मीना सोयीचे व्हावे म्हणून ऐरोलीत नाटय़गृह सोयीचे होईल, म्हणून सन २०१४ मध्ये ऐरोली से. ५ येथील माऊ ली संकुलाजवळील भूखंडावर पालिकेच्या वतीने भूमिपूजन करण्यात आले होते. त्याला चार वर्षे झाली तरी या ठिकाणी साधी पायाभरणीही झाली नाही. केवळ खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे मोठे डबके तयार झाले आहे.

या ठिकाणी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे त्या खोदकाम केलेल्या भूखंडावर तात्पुरते कंपाऊंड बांधण्यात आले आहे. परंतु तळे तयार झाल्याने तसेच उभारलेल्या कंपाऊं डच्या सभोवताली झाडी तयार झाली आहे. त्यामुळे तो भूखंड अडगळीत पडला आहे.

नाटय़गृहाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या आधीच्या महावीर कंपनीच्या ठेकेदाराने आर्थिक सबब पुढे करून काम रखडवले होते. नाटय़गृहाचे काम २०१६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र ठेकेदाराने कोणत्याच कामाला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे त्या ठेकेदाराला रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत. निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा मागविण्यात आल्याचे पालिका अभियंता यांनी सांगितले आहे.

आणखी दोन वर्षे लागणार

या नाटय़गृहाच्या बांधकामासाठी पुन्हा ‘ई निविदा’ मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक ते दोन महिन्यात कामाचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानंतर २४ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने काम पूर्ण करून देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या ऐरोली नोडमधील कार्यकारी अभियंता शिरीष गुमास्ते यांनी दिली. या नाटय़गृहाच्या उभारणीकरिता ३० कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.

ऐरोलीतील नाटय़रसिकांना ठाणे किंवा वाशी हा ११ किलोमीटरचा पल्ला गाठावा लागत आहे. त्याऐवजी जवळच नाटय़गृह सुरू झाले तर सोयीचे होईल. तसेच नवी मुंबईतील नाटय़कलावंतांना अजून एक रंगभूमी, व्यासपीठ उपलब्ध होईल. मात्र भूमिपूजनानंतर दोन वर्षांनंतरही काम रखडून पडले आहे.     वैभव मांगले, कलाकार

ऐरोलीतील नाटय़गृहाचे काम रखडले आहे. ते लवकर सुरू व्हावे, अशी नवी मुंबई नाटय़ परिषदेची मागणी आहे. तसेच नाटय़गृह बांधकाम करताना पालिकेने नाटय़ परिषदेतील जाणकारांचे मत लक्षात घेऊन त्यांना नाटय़गृहात कोणते नियोजन अपेक्षित आहे, हे विचारात घ्यावे.   सुरेश लाड, कलाकार, ऐरोली