ऐरोलीतील नाटय़गृहाच्या भूमिपूजनानंतरही तीन वर्षे बांधकाम रखडले

नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघात नागरिकांसाठी नाटय़गृहाचा भूमिपूजन सोहळा मोठय़ा थाटात झाला; मात्र तीन वर्षे उलटूनही बांधकामाची साधी वीटही चढलेली नाही. या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री, आमदार, महापौरांनी कामाचे श्रेय घेतले होते; मात्र या काळात यातील एक जणही या ठिकाणी अद्याप फिरकलेले नाही. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी नाटय़गृहाचे काम जाणीवपूर्व रखडवले जात असल्याचे बोलले जात असून प्रस्तावित नाटय़गृहाच्या पायात सध्या तळे साचले आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे कामाच्या ठेकेदारांवर काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

१४ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

ऐरोली सेक्टर-५ मधील आरक्षित भूखंड क्रमांक-३७ वर सुमारे दोन हजार ८९६ चौरस मीटर आणि बांधकाम क्षेत्रफळात ६० कोटी ७० लाख ९ हजार रुपये खर्चून हे नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची पार्किंग सुविधा, एक हजार आसनक्षमतेचे प्रेक्षागृह, उपाहारगृह, अधिकार कक्ष, असे चार मजली नाटय़गृहाचे काम प्रस्तावित आहे.

भूमिपूजनानंतर नाटय़गृहाच्या श्रेयाचे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आले. या नाटय़गृहाचा कळवा आणि ठाणे परिसरातील नाटय़प्रेमींना फायदा होणार आहे. या ठिकाणी असलेले दगड फोडण्याचे काम तीन वर्षांत महावीर कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे. खोदकाम करून किमान पहिला मजला तरी उभारण्याची गरज होती; मात्र सुरुवातीला राजकीय देखावा करण्यात आला. या साऱ्या दिरंगाईचा परिणाम कामावर झाला आहे. खोदलेल्या ठिकाणी गेल्या पावसाळ्यात तळे साचले होते.

ऐरोली मतदारसंघात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर या कामाला राजकीय वळण लागले आहे. श्रेय घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली खाडीकिनारी दुसऱ्या जॉगिंग ट्रॅकचा शुभांरभ केला, तर आमदारकीच्या काळापासून आजवर अनेक प्रभांगाना भेटी दिल्या, मात्र महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख अशा नाटय़गृहाकडे त्यांचे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नाटय़गृह ३१ ऑगस्ट २०१६ रोजी तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे आवश्यक होते; परंतु याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नवी मुंबई पालिका प्रशासनाने एखादा प्रकल्प उभारताना त्याच्या कामाचा लेखाजोखा ठेवणे गरजेचे होते; मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करीत कामाला प्रारंभ केलेला नाही. याबाबत आमदार संदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

आयुक्तांकडून अपेक्षा

ऐरोली नाटय़गृहाच्या कामासाठी तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्यांच्या कारकीर्दीत पुढाकार घेणे गरजेचे होते; मात्र त्याच्या दीड ते दोन वर्षांच्या कालखंडातही त्यांची पावले या ठिकाणी वळली नाहीत. नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालून या कामाला खो घालणारे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करत हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा अशी मागणी होत आहे.

वाशीत एकमेव नाटय़गृह आहे. आणखी एक नाटय़गृह ऐरोलीला झाल्यास रसिकांची सोय होणार आहे. कामांचा शुभारंभ होऊन त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

ऐरोली नाटय़गृहाची निर्मिती झाल्यानंतर नव्या कलाकारांना आपल्या हक्काचे व्यसपीठ निर्माण होणार होते. ही आनंदाची बाब होती.  मात्र मागच्या साडेतीन वर्षांमध्ये या नाटय़गृहाचंी मुहूर्तमेढ रोवली गेली नाही.

जयराज नायर, सिनेअभिनेता

अशोक पालवे, उपाध्यक्ष अखिल भारतीय नाटय परिषद नवी मुंबई 

सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणत ऐरोली नाटय़गृहाचे काम रखडवण्यात आले आहे. यात राजकारण आणणे चुकीचे आहे. संबंधित ठेकेदारावर पालिका आयुक्तांनी दंडात्मक कारवाई करावी.

मनोहर मढवीनगरसेवक