एकही खाट शिल्लक नाही; शहराबाहेरील करोना रुग्णांची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून विशेष सुविधा देणाऱ्या काही अद्ययावत खासगी रुग्णालयांत दाखल करून घेण्यासाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. या रुग्णालयातील रुग्णशय्या व्यापलेल्या आहेत. १६ पैकी आठ रुग्णालयांत सध्या एक खाट शिल्लक नाही. तर ११ रुग्णालयांत दहापेक्षा कमी खाटा शिल्लक आहेत.

शहरात १६ खासगी रुग्णालयांनी सर्मपित करोना रुग्णालय कक्ष सुरू केले असून अद्ययावत आरोग्य सेवेमुळे स्थानिक रुग्णांबरोबरच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, उरण या आजूबाजूच्या छोटय़ा-मोठय़ा शहरांतील खर्च करण्याची तयारी असलेल्या अनेक रुग्णांनी या रुग्णालयामध्ये धाव घेतली असल्याने  या रुग्णालयांत सद्या प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे.

एकही खाट शिल्लक नसलेल्या रुग्णालयांत फोर्टीज, रिलायन्स, इंद्रावती ऐरोली, लक्ष्मी मलीटीपर्पज घणसोली, राजपाल कौपरखरणे, एमजीएम वाशी, सिद्धीकी कोपरखरणे आणि ग्लोबल हेल्थ किअर या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने काही रुग्णांना प्रतीक्षा यादीवर ठेवले आहे.

रिलायन्स रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी एकूण १०० रुग्णशय्या तयार ठेवण्यात आलेल्या असून त्या पूर्णपणे भरलेल्या आहेत. हीच स्थिती या रुग्णालयाच्या घणसोली येथील आयटी पार्क आरोग्य केंद्रातील आहे. बेलापूरच्या अपोलो रुग्णालयातील

१७४ पैकी १२६ रुग्णशय्या व्यापलेल्या अहेत.  वाशी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एमजीएम रुग्णालयातही कोविड रुग्णांसाठी ४०रुग्णशय्या क्षमता आहे. त्या ठिकाणीही आता अधिक कोविड रुग्णांना प्रवेश देता येणार नाही अशी स्थिती आहे.  याशिवाय वाशी येथील फोर्टिज रुग्णालयाने ८५ राखीव ठेवलेल्या खाटांपैकी एकही खाट सध्या शिल्लक नाही.

नवी मुंबईतील खासगी तसेच पालिकेची आरोग्य सुविद्या चांगली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शहरातील रुग्ण देखील या सुविद्येवर अधिक विश्वास व्यक्त करीत असल्याने खासगी रुग्णालयात ४० टक्के रुग्ण हे शहराबाहेरच आहेत. काही खासगी रुग्णालयातील रुग्णशय्या भरलेल्या असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयांची संख्या कमी पडू नये म्हणून बंद करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांना पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

अपोलो रुग्णालयाची कोविड रुग्णशय्या क्षमता सध्या १४० आहे. ती टप्याटप्याने वाढविली जात असून सध्या सर्व रुग्णशय्या व्यापलेल्या असून काही रुग्ण हे प्रतीक्षा यादीवर आहेत. अपोलोमध्ये कॅन्सरसह इतर आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचार घेत असल्याने अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

संतोष मराठे, प्रमुख, अपोलो रुग्णालय, बेलापूर

खाटांची सद्य स्थिती

खाटांचा प्रकार          एकूण   उपचार  शिल्लक

अतिदक्षता खाटा :       ४३९    ३०२      १३७

प्राणवायू खाटा:           १६४७   १०६०   ५८७

साध्या खाटा :               १२९०   ८९०    ४००

कृत्रिम श्वसन यंत्रणा :    १४९    ७०     ७९

एकूण                          ३५२५   २३२२   १२०३