News Flash

लस तुडवडय़ामुळे नवी मुंबईत दररोज फक्त हजार मात्रा!

दररोज १५ हजार जणांचे लसीकरण करण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

नवी मुंबई महापालिकेची लसीकरण मोहीम विस्कळीत; पाच दिवसांत ८,८६३ जणांनाच मात्रा

नवी मुंबई : दररोज १५ हजार जणांचे लसीकरण करण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. मात्र लस मिळत नसल्याने गेल्या पाच दिवसांत फक्त ८८६३ जणांनाच मात्रा देणे शक्य झाले आहे. तीही फक्त दुसरी मात्राच. त्यामुळे दिवसाला सरासरी एक हजार मात्रा नवी मुंबईकरांना मिळत आहेत. त्यात महापालिकेने स्पुटनिक लस खरेदी करण्याचे नियोजनही अद्याप प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबई शहरात एकूण लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील पात्र लसीकरण लाभार्थी ११ लाख आहेत. त्यापैकी पहिली मात्रा ६ लाख १५ हजार २९६ व दुसरी मात्रा १ लाख ६१ हजार २७३ जणांना देण्यात आली आहे. म्हणजे एकूण ७ लाख ७६ हजार ५६९ जणांना मात्रा देण्यात आली आहे. हे प्रमाण पात्र लाभार्थीच्या तुलनेत ६० टक्के इतके आहे, तर नवी मुंबई महापालिकेला शासनाकडून ४ लाख ६१ हजार १६० मात्रा मिळाल्या आहेत. शासनाकडून लस मिळत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. अल्प लसपुरवठा मिळत असल्याने पालिका प्रशासनाने त्यातून नियोजन करावे लागत असून दुसरी मात्रा दिली जात आहे, तर शहरात ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकणाऱ्या संभाव्य घटकांना प्राधान्याने लस दिली जात आहे. मात्र यामुळे अनेक दिवस नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

महापालिका प्रशासनाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जम्बो लसीकरण केंद्राबरोबरच १०० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे सज्ज ठेवली आहेत. मात्र ती गेली अनेक दिवस बंदच आहे. लसच नाही तर लसीकरण करायचे कसे, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळे उपलब्ध लससाठय़ानुसार प्रशासन आदल्या दिवशी उद्याचे लस नियोजन जाहीर करीत आहे. १ जुलैपासून नवी मुंबई महापालिकेला शासनाकडून फक्त ३४ हजार ६९० मात्रा मिळाल्या आहेत. म्हणजे गेल्या १५ दिवसांत सरासरी फक्त दोन हजार जणांनाच लस देणे शक्य आहे. तर गेल्या पाच दिवसांत पालिकेला अल्प तुटवडय़ामुळे फक्त ८८६३ जणांनाच मात्रा देणे शक्य झाले आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी १ हजार जणांना लस दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीतही नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही व्यथा मांडली असून अधिकची लस मिळावी, अशी विनंती केली आहे.

एका दिवसाला १५ हजार मात्रा लसीकरण करण्यात आले आहे. वेगात लसीकरण करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. १११ केंद्रांवर लसीकरणाची तयारी ठेवली आहे. मात्र लसतुटवडय़ामुळे दिवसाला फक्त मोजकीच केंद्रे सुरू ठेवावी लागत आहेत.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:38 am

Web Title: thousand doses day navi mumbai vaccination ssh 93
Next Stories
1 शहराचा विकास आराखडा जाहीर करण्यासाठी साकडे
2 कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई!
3 ‘सिडको नोड’च्या विकासाला गती
Just Now!
X