पनवेल : एन आर आय पोलिसांनी नुकतेच चोरीच्या गुन्ह्यात ४ जणांना अटक केली. पैकी तिघे आरोपी करोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पकडून आणणाऱ्या तपास पथकातील पोलिसांचीही करोना तपासणी करण्यात आली आहे.
संजय बीरमल अपुणे, प्रताप वसंतराव लोमटे-पाटील, दत्ता बापू कांबळे, रोशन राजेंद्र कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. १६ ऑगस्ट रोजी वाहन चोरी झाल्याचा गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यासंबंधी तपास करताना आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे पनवेल परिसरातून चौघांना अटक करण्यात आली.
चौकशीतून नेरुळ आणि तळोजा येथील ट्रक चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा झाला. यातील संजय अपुणेवर एपीएमसी नेरुळ तळोजा आणि कळंबोली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
आरोपीकडून ३० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती तपासाधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चासकर यांनी दिली.
आरोपींना पकडण्यात आल्यावर नियमाप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी करताना तिघांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
यातील एक जण वाशी, दोन जण पनवेल येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असून अन्य एक तळोजा कारागृहात आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालामुळे त्यांना पकडणाऱ्या पथकातील ७ जणांची करोना तपासणी करण्यात आली; मात्र अन्य कोणालाही करोना झाल्याचे समोर आले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 2:08 am